मेन
फोटो : H34565
गोवत्स पूजनाने दिवाळीचा मंगलारंभ
घराघरांत सणाची लगबग; गाई-वासरांचे औक्षण, पूजन, गोडधोडाचा नैवेद्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : दिवाळीच्या आनंदपर्वाला गुरूवारी (ता. ५) वसुबारस या पहिल्या सणाने मंगलमय सुरुवात झाली. हिंदू संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने वसुबारसनिमित्त गाईचे वासरासह पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहरातील विविध भागांत पारंपरिक पद्धतीने गोवत्स पूजन करत नागरिकांनी दिवाळीचे उत्साहात स्वागत केले. घराघरांत सणाची लगबग, अंगणात रांगोळ्या, दारात आकाशकंदील आणि पूजेच्या तयारीमुळे सर्वत्र दीपोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
वसुबारसला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. या दिवशी गाईला स्नान घालून तिच्या अंगावर हळद-कुंकू, फुले वाहून औक्षण करण्यात आले. वासराचेही पूजन करून गाईला गोडधोडाचा नैवेद्य दाखविला गेला. काही ठिकाणी गाईला पुरणपोळी, गूळ, हरभरा आणि हिरवा चारा खाऊ घालण्याची परंपरा असल्याने गोठ्यामध्ये पूजन करण्यात आले. गोमातेच्या पूजनातून समृद्धी, संततीसौख्य आणि कुटुंबाच्या कल्याणाची कामना केली जाते, त्यामुळे आशीर्वाद प्राप्त होत असल्याचे परंपरेत सांगण्यात आले आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात राहणाऱ्या अनेक कुटुंबांनी जवळच्या गोशाळांमध्ये जाऊन गोपूजन केले. काही ठिकाणी गोशाळांकडून पूजेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ज्या घरांमध्ये गाय उपलब्ध नाही, अशा कुटुंबांनी गाय-वासराच्या प्रतिमेचे पूजन करून परंपरा जपली. अनेक महिलांनी मुलांच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीची कामना करत व्रत-उपवास केला. सायंकाळी घरांच्या अंगणात रांगोळ्या रेखाटून पणत्या लावण्यात आल्या. दारात तोरण, घरात पूजेची तयारी आणि फराळाच्या पदार्थांचा दरवळ यामुळे नाशिकमध्ये दिवाळीचा खरा माहोल अनुभवायला मिळाला. वसुबारसेच्या निमित्ताने गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत नाशिककरांनी परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपला. शुक्रवारी (ता.६) रोजी धनत्रयोदशीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून दीपोत्सवाच्या आनंदाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
--- चौकट
आज धनत्रयोदशीनिमित्त पूजन
आज, (ता.६) शुक्रवार रोजी धनत्रयोदशी असल्याने धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात येणार आहे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता असल्याने या दिवशी पूजन करण्यात येते. तसेच या दिवशी संपत्तीची देवी माता लक्ष्मी आणि धनाचे संरक्षक भगवान कुबेर यांचे पूजन केले जाते. यमराजासाठी दक्षिण दिशेला दिवा लावण्याची यादिवशी परंपरा आहे, त्याला यमदीपदान म्हणतात. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने, नवी भांडी किंवा धातूची वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.