मेनफिचर
टुडे पान एकसाठी
-------------
दुष्काळाचा तडाखा शेताला, महागाईचा चटका ताटाला!
--------
धान्य-डाळी दरात वाढ; सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचीही आर्थिक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१८ : जिल्ह्यात पावसाचा खंड, खरीप पिकांवरील प्रतिकूल परिणाम व बाजारातील मागणी व पुरवठ्यातील असमतोलाच्या पार्श्वभूमीवर धान्यासह डाळींच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थकारणाला धक्का दिला. एका बाजूला पावसाअभावी पिकांचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे, तर दुसऱ्या बाजूला किराणा खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने सर्वसामान्यांचे मासिक आर्थिक बजेट कोलमडत आहे. दुष्काळाचे संकट आता केवळ शेतापुरते मर्यादित न राहता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे. डाळींसह गहू, तांदळाचे दर २५ ते ४० टक्के वाढले आहेत.
तूरडाळ, हरभरा डाळ, मूगडाळ यांसारख्या रोजच्या आहारातील पदार्थांचे दर वाढल्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवरील आर्थिक ताण वाढत आहे. शेतीचे उत्पादन पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. पेरणीनंतर पावसाचा दीर्घखंड पडला आहे. पिकांची वाढ खुंटून उत्पादनात ६० टक्के घट आली आहे. उत्पादन घटल्याने बाजारात येणारा माल कमी झाला आहे. त्यात सणासुदीची मागणी, वाहतूक खर्च व व्यापाऱ्यांच्या खरेदी-विक्रीतील बदलाची भर पडल्याने किरकोळ दरांवर परिणाम झाला आहे.
गृहिणींचे बजेट बिघडले
महिन्याच्या किराणा खर्चात डाळी व धान्यांचा मोठा वाटा असतो. दूध, भाजीपाला, खाद्यतेल, सिलिंडर व औषधोपचारांचा खर्च आधीच वाढलेला असताना डाळींच्या दरवाढीमुळे बचतीसाठी उपलब्ध असलेली रक्कम कमी झाली आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना डाळींचे प्रमाण कमी करणे, स्वस्त पर्याय निवडणे किंवा इतर गरजांवर खर्च कमी करावा लागत आहे. विशेषतः रोजंदारीवर काम करणारे मजूर, लहान व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक व एकाच कमावत्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना महागाईचा अधिक फटका बसला आहे.
विरोधाभासी परिस्थिती
दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. पिकांचे उत्पादन घटल्याने त्याचे उत्पन्न कमी झाले आहे. त्याचवेळी बियाणे, खते, औषधे, मजुरी व जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे. बाजारात एखाद्या धान्याचा किंवा डाळीचा किरकोळ भाव वाढला, तरी त्याचा संपूर्ण फायदा शेतकऱ्याला मिळेलच असे नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात पीक नुकसानीचे पंचनामे, पीकविमा भरपाई, योग्य हमीभाव, सरकारी खरेदी व रोजगार हमीची कामे वेळेत सुरू होणे महत्त्वाचे आहे.
शाासनासमोर दुहेरी आव्हान
एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे व दुसरीकडे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे, अशी दुहेरी जबाबदारी शासनासमोर आहे. दुष्काळामुळे शेतीचे अर्थकारण संकटात असताना धान्य-डाळींच्या दरवाढीने ग्राहकांचेही कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्याला उत्पादनाचा योग्य मोबदला व ग्राहकाला परवडणाऱ्या दरात अन्नधान्य मिळणे, या दोन्ही गोष्टी साध्य करणे हेच प्रशासनापुढील खरे आव्हान आहे.
------------
गेल्या काही महिन्याभरातील भाववाढ अशी
धान्याचे प्रकार---मार्चमधील दर--आजचे दर (प्रतिकिलो रुपयांत)
तुरडाळ---१०० ते ११०---१५०
हरभरा डाळ--६० ते ६५--९५ ते १००
मुगडाळ --९५ ते १००--१२० ते १३०
उडीद डाळ--९० ते ९५---१३० ते १३५
तांदूळ -
कोकम--४५ ते ५०--७० ते ७५
चिनोर--४४ ते ४५--५८ ते ६०
कालीमुछ--५० ते ५२--६८ ते ७०
गहू--
शरबती--३० ते ३४---३४ ते ३८
वन फोर सेवन--३० ते ३४---३४ ते ३८
चंदोशी--५०--६०
--------------
कोट..
यंदा पाऊस ७३ टक्के झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे उत्पादन घटले आहे. परिणामता कडधान्य, गव्हाच्या दरात २५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. आगामी काळात शासन कडधान्य, गव्हाबाबत आयातीचे काय धोरण ठरविते, त्यांच्याकडील साठाविक्रीस काढते. यावर कडधान्याचे भाव ठरतील. मात्र, आवक कमी झाली की भाव वाढ होईल.
- प्रवीण पगारिया, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ, जळगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.