नाशिक

अभियंत्यांच्या कल्पक कर्तृत्वाचा दीपस्तंभ; इंजि. हरिभाऊ गिते यांचा प्रेरणादायी प्रवास

CD
कल्पक कर्तृत्वाचा दीपस्तंभ : इंजि. हरिभाऊ गिते लीड सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठणे आणि त्याचवेळी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणे, हीच खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची ओळख. अभियंता म्हणून शासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी, जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणि स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांतून हजारो विद्यार्थ्यांना दिशा देणारे इंजि. हरिभाऊ कारभारी गिते हे राज्यातील अभियंत्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. - योगेश मोरे संगमनेर तालुक्यातील सोनोशी हे त्यांचे जन्मगाव. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गिते यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र, शिक्षणाची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. विद्यार्थी सहायक समितीच्या कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहिलेल्या या प्रवासानेच त्यांच्या पुढील यशाचा पाया घातला. २००१-०२ मध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००३-०४ मध्ये एका कंपनीत कार्यरत असताना पुणे-सातारा चारपदरी महामार्गाच्या कामात योगदान दिले. त्यानंतर २००५ ते २००८ या काळात पुण्यातील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे अमरावती गृह व क्षेत्रविकास मंडळात उपअभियंता म्हणून जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत जलसंपदा विभागात सहायक अभियंता श्रेणी-१ या पदावर त्यांची निवड झाली. सहायक अभियंत्यापासून अधीक्षक अभियंतापदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा मेहनत, अभ्यास, शिस्त आणि कार्यनिष्ठेचा वस्तुपाठ आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये काम करताना त्यांनी नावीन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबवून अभियंत्यांच्या कौशल्यविकासाला चालना दिली. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (मेरी) येथे उपसा सिंचन योजनांच्या संकल्पचित्रांच्या कामात योगदान दिले. नाशिक आणि अकोला जिल्ह्यांत जलसंधारण अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सध्या नाशिक विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या निर्मितीत सहायक अभियंता म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धरणाच्या कामादरम्यान भूमिपुत्रांची आंदोलने, पुनर्वसनाचे प्रश्न, मोबदल्याच्या मागण्या आणि पाण्याच्या वाटपावरून निर्माण होणारे वाद अशा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र, व्यापक दृष्टिकोन, संवादकौशल्य आणि समन्वयाच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. आजही अनेक नागरिक विविध प्रश्नांवर त्यांचे मार्गदर्शन घेतात. नाशिक जिल्ह्यात जलसंधारणाची अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. शासकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतानाच त्यांनी लेखन आणि ज्ञानदानाचा वसा जपला आहे. एमपीएससी आणि यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी ६० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सरळसेवा वर्ग-१ अभियांत्रिकी अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. अधिकारी आणि अभियंत्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न केले. तत्कालीन जलसंधारणमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी समर्थपणे काम पाहिले. अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे पद भूषवतानाही गिते यांनी शेतीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. वडील स्व. कारभारी दादा गिते यांच्याकडून मिळालेले कृषीविषयक संस्कार त्यांनी जपले आहेत. सोनोशी येथील सुमारे ३० एकर डोंगराळ जमिनीवर नियोजन आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर शेतीत त्यांनी उल्लेखनीय काम उभे केले. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि विषमुक्त अन्नासाठी सक्षम व शाश्वत शेती आवश्यक असल्याचा त्यांचा आग्रह आहे. साधी राहणी, उच्च विचार, अभ्यासू वृत्ती आणि निगर्वी स्वभाव ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. आई सुमनबाई यांचे आशीर्वाद, पत्नी इंजि. जयश्री पालवे यांची समर्थ साथ आणि कुटुंबाचे पाठबळ यामुळेच समाजासाठी अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ते मानतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! कर्मभूमी एक्स्प्रेसच्या ४ डब्यांना भीषण आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

Thane News: झाडांना लाईटिंग लावणाऱ्यांना दणका! गुन्हा दाखल, कारवाईला सुरुवात

Solapur Pune Highway Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! इर्टिगा-कंटेनरची धडक; ८ वर्षांच्या चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू

Latest Marathi News Update : नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांत १० टक्के पाणीकपात लागू

IND U19 vs NEP U19 : आर्यवीर सेहवागच्या वादळी ७० धावा; लक्ष्यसोबत भारताला Asia Cup मध्ये मिळवून दिला विजय, आता पाकिस्तानला चोपणार...

SCROLL FOR NEXT