दुर्ग पर्यटन
(२१ वा लेख)
--------
NSK26H32635 (डॉ. नि.रा. पाटील)
NSK26H32634 (देवदत्त गोखले)
जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा
--------------------------------
कान्हदेशचे दुर्ग
तापी-पूर्णा-गिरणा नद्यांच्या सुपीक खोऱ्यात वसलेल्या जळगाव जिल्ह्याने केवळ केळी, कपाशी, सोन्यासाठीच नव्हे, तर सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अनेक ऐतिहासिक किल्ले आणि भुईकोटांच्या माध्यमातूनही आपली विशेष ओळख जपली आहे. कान्हदेशचे हे दुर्ग आजही इतिहास आणि निसर्गाचा सुरेख संगम साधत, प्रेरणा देत भक्कमपणे उभे आहेत.
- डॉ. नि. रा. पाटील, मुंबई
- डॉ. देवदत्त गोखले, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील किल्ल्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे गिरीदुर्ग (डोंगरावरील किल्ले) आणि भुईकोट (सपाट जमिनीवरील किल्ले). या दोन्ही प्रकारच्या स्थापत्यकलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. सातपुडा आणि सातमाळा या पर्वतरांगांमध्ये गिरीदुर्ग वसलेले आहेत, तर तापी-गिरणा नद्यांच्या सुपीक मैदानी प्रदेशात भुईकोट, नगरकोट आणि गढ्या आहेत.
-----------------------------------
NSK26H32473
पारोळा : तालुक्यातील भुईकोट किल्ल्याची तटबंदी.
NSK26H32475
पारोळा : तालुक्यातील भुईकोट किल्ल्यातील पुरातन महादेव मंदिर. (छायाचित्रे : देवदत्त गोखले)
पारोळा भुईकोट
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बसस्थानकाजवळ हा भुईकोट आहे. पारोळा शहराला चारही बाजूंनी तटबंदी आणि सात दरवाजे होते. यातील दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा. किल्ल्याच्या दरवाजातून प्रवेश करून पुढे गेल्यावर काटकोनात दुसरा दरवाजा आहे. तटबंदीत घोड्यांच्या पागा आहेत. मुख्य किल्ला आणि बालेकिल्ला असे किल्ल्याचे दोन भाग आहेत. बालेकिल्ला मध्यभागी असून त्याला चार भव्य बुरूज आहेत. झरोके आणि जंग्या दिसतात. किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. पारोळा भुईकोट वास्तुशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सद्यःस्थितीत किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. हा किल्ला जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधल्याची नोंद आहे. या किल्ल्याने इंग्रजांविरुद्ध एकेकाळी बंड पुकारला. स्थानिक लोकांच्या मते झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर पारोळ्याचे असून, ते तांबे घराणे आजही पारोळा गावात राहते.
---------------------------------------
NSK26H32480
चाळीसगाव : तालुक्यात गौताळा अभयारण्यात उभारण्यात आलेला कन्हेरगड. (संग्रहित छायाचित्र)
कन्हेरगड (चाळीसगाव तालुका)
चाळीसगाव तालुक्यातील गवताळा अभयारण्यात, सातमाळा डोंगररांगेत वसलेला कन्हेरगड महत्त्वाचा गिरीदुर्ग (डोंगरी किल्ला) आहे. कन्हेरगडाचा डोंगर अग्नेय-वायव्य आहे. प्राचीन काळातील हा किल्ला निसर्गाने वेढला आहे. किल्ल्याखाली लेण्या आहेत. उंच कातळकडा चढल्यावर आपण किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करतो. येथूनच समोर आपल्याला बालेकिल्ला दिसतो. बालेकिल्ल्याकडे जाताना खोदलेले खांब टाके दिसते. किल्ल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या, पाण्याची तळी, आणि प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला मिळतात. पश्चिमाभिमुख दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भक्कम बुरूज आहेत. दरवाजाच्या आत देवड्या आहेत. गडमाथ्यावर वाड्याचा चौथरा, हनुमानाची मूर्ती व पाण्याचे टाके आहे. जवळच असलेले प्रसिद्ध पाटणादेवी मंदिर आणि गणिताचार्य भास्कराचार्य यांचे कर्मस्थान यामुळे या परिसराला ऐतिहासिक व आध्यात्मिक ओळख प्राप्त आहे.
---------------------------------------
बहादरपूर भुईकोट (पारोळा तालुका)
पारोळा आणि अमळनेर शहरांच्या मध्यभागी बोरी नदीच्या काठावर वसलेला बहादरपूरचा भुईकोट (गढी) आहे. बहादूरखान सूरी याने हा किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. मराठेशाही आणि पेशवेकाळात हा किल्ला लष्करी छावणी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्वाचा ठरला. किल्ल्याचे विशाल बुरुज, उंच तटबंदी, आणि नदीकाठची मोक्याची जागा आजही पर्यटकांचे आणि इतिहासप्रेमींचे लक्ष वेधून घेते. किल्ल्यावर पर्शियन आणि अरबी भाषेतील एक प्राचीन शिलालेख सापडला असून तो सध्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला असल्याचे समजते. पेशवे- गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे लढाई झाली. तसेच, १८१८ मध्ये ब्रिटिशांनी अमळनेर भुईकोटावर हल्ला करण्यापूर्वी त्याची रसद बंद करण्यासाठी प्रथम हा किल्ला जिंकून घेतला.
----------------------------------
NSK26H32476
चोपडा : तालुक्यातील चौगावच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार.
चौगावचा किल्ला (चोपडा तालुका)
सातपुड्याच्या घनदाट रांगांमध्ये चोपडा तालुक्यातला नितांत सुंदर डोंगरी किल्ला म्हणजे त्रिवेणीगड (चौगाव किल्ला / विजयगड). प्राचीन काळापासून दक्षिणेतून मध्यप्रदेशात जाणाऱ्या भिराम घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी तीन ओढ्यांचा संगम, प्राचीन महादेव मंदिर आणि जवळच नयनरम्य धबधबा आहे. ट्रेकर्स आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी चौगाव किल्ला म्हणजे पर्वणीच असते. किल्ला व आसपासचा परिसर वनखात्याच्या ताब्यात आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. दक्षिण दरवाजाच्या बाहेरील बाजूला तटबंदीत मोठे खोदीव टाके आहेत. गडावर दोन वाड्यांचे अवशेष आहेत. गडाचा दुसरा (पूर्वाभिमुख) दरवाजा घडीव आयताकृती दगडात बांधलेला आहे. तोही उत्तम स्थितीत आहे.
-----------------------------------
गवळीगड (यावल तालुका)
हा किल्ला वैशाखगड किंवा मनापुरी अशा नावांनीही ओळखला जातो. स्थानिक लोक याला गवळी राजाचा किल्ला म्हणून संबोधत असल्याने गवळीगड हे नाव प्रचलित झाले. जळगाव जिल्ह्याच्या यावल वनक्षेत्रात हा सुंदर, परंतु दुर्लक्षित वनदुर्ग आहे. या भागात सातपुडा पर्वत रांगांची उंचीही सर्वाधिक आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी सुप्रसिद्ध मनुदेवी मंदिराजवळून जाणारी वाट सोपी आणि सोयीची आहे. किल्ल्याच्या पठारावर डोंगर उतारावर मातीने भरलेला मोठा तलाव पाहायला मिळतो. स्थानिक माहितीनुसार, अभीर राजवटीच्या काळात ईश्वरसेन नावाच्या गवळी राजाने या किल्ल्याची बांधणी केली. इंग्रजांच्या ताब्यात येण्यापूर्वी हा किल्ला ग्वाल्हेरच्या सरदार शिंदे यांच्याकडे असल्याचे समजते.
---------------------------------
पालचा भुईकोट (रावेर तालुका)
जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत पाल हे अभयारण्य व थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण आहे. रावेर तालुक्यात यावल वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणारे हे निसर्गरम्य ठिकाण लोकांना पर्यटन स्थळ म्हणून प्रचलित आहे. परंतु येथील किल्ला मात्र फारसा परिचित नाही. पाल किल्ल्याची तटबंदी व बुरूज नष्ट झाले असून वनखात्याच्या विश्रामगृहाच्या आवारात असलेला एक बुरूज पाहायला मिळतो. गावातून विश्रामगृहाकडे जाताना वाटेच्या उजव्या बाजूस पूर्णपणे दगडात बांधलेली जुनी मशीद पाहायला मिळते. किल्ल्यात जाण्यासाठी उत्तराभिमुख दरवाजा व त्यावरील कमान आजही सुस्थितीत आहे. तटबंदीत वासे अडकविण्याच्या खुणांवरून तटबंदीला लागून दुमजली वास्तू असण्याची शक्यता आहे. स्थानिक या ठिकाणाला हत्तीखाना/हत्तीवडा म्हणून ओळखतात.
--------------------------------
यावल भुईकोट
सातपुडा पर्वतरांगेतील तापी नदीच्या खोऱ्यात असलेले यावल शहर हे महाभारताचे रचिता महर्षी व्यास यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. याच यावल शहरात सूर नदी (हुडकाई-खड्काई संगम) काठावर हा भुईकोट आहे. हा किल्ला मध्ययुगीन काळातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होता. किल्ल्याचा आकार चौकोनी असून तटबंदीत नऊ बुरूज आहेत. किल्ला उंचवट्यावर असल्याने येथून संपूर्ण यावल शहर दिसते. बुरुजांवर बंदूक आणि तोफांच्या मारगिरीसाठी जंग्या पाहायला मिळतात. सातपुड्यातील घाटातून येणारा माल या मार्गाने येत असल्याने या व्यापारी मार्गावर यावल आणि पाल या दोन्ही ठिकाणी किल्ले बांधले गेले. यावल पूर्वीपासून व्यापाराचे मोठे केंद्र होते. मराठेशाहीच्या काळात शिंदे (ग्वाल्हेर) आणि निंबाळकर यांच्या ताब्यात हा किल्ला होता. हा किल्ला यावल न्यायालयाच्या अगदी जवळ आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावर प्रसिद्ध ''व्यास मंदिर'' असून तेथूनही संपूर्ण शहराचा देखावा दिसतो.
--------------------------------------
NSK26H32478
भडगाव : तालुक्यातील शहराच्या संरक्षणार्थ बांधलेला नगरकोट किल्ला. (संग्रहित छायाचित्र)
भडगाव नगरकोट
जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीच्या काठावर वसलेले भडगाव हे महत्त्वाचे शहर आहे. चाळीसगाव, पारोळा, आणि एरंडोल या शहरांच्या मध्यावर भडगाव आहे. मध्ययुगीन काळात या भरभराटीच्या शहराच्या संरक्षणासाठी संपूर्ण शहराभोवती कोट (तटबंदी) बांधण्यात आला. या किल्ल्याचा एक दरवाजा याच नदीच्या दिशेने आहे. दरवाजाजवळ महादेवाचे मंदिर आणि गणपतीचे नव्याने बांधलेले मंदिर आहे. भडगावचा लाडकूबाई देशपांडेंचा वाडा (गढी) प्रसिद्ध आहे. याच वाड्यात सध्या लाडकूबाई विद्यालय आहे. पूर्वी वाड्याला चार बुरूज होते; त्यातील एक नामशेष झाला आहे. भडगाव- कासोदा मार्गावर या नगरकोटाचा आणखी एक बुरूज नजरेस पडतो.
------------------------------------------
NSK26H32491
अमळनेर : शहरातील बोरी नदीलगत स्थित दगडी दरवाजा.
अमळनेरचा नगरकोट
अमळनेर शहराच्या एका बाजूस बोरी नदी आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून नदीच्या बाजूला तटबंदी व बुरूज बांधण्यात आले. शहराचे उर्वरित तीनही बाजू दरवाजे, उंच तटबंदी, आणि बुरूज बांधून संरक्षित केले गेले. हाच अमळनेर शहराचा नगरकोट. या किल्ल्याचा एक दरवाजा व त्याच्या दोन्ही बाजूचे दोन बुरूज पाहायला मिळतात. नुकतेच त्यांचे संवर्धन झाले आहे. ब्रिटिशांनी १८१८ मध्ये खानदेशवर आपला ताबा मिळवला. त्या वेळी पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचे ठरले. परंतु किल्ल्याचा जमादार व त्याच्या हाताखालची अरब पलटण यांनी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचे नाकारले. तेव्हा मालेगावहून ब्रिटिश कर्नल त्याच्या आधिपत्याखाली असलेली सुमारे १००० लोकांची बटालियन घेऊन किल्ल्यावर चालून आला. नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यावर तोफांचा मारा केला. किल्ल्यातील सैन्याने शर्थीचे प्रयत्न केले. पण एवढ्या मोठ्या फौजेशी सामना देणे त्यांना शक्य झाले नाही. शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
या व्यतिरिक्त एरंडोल, खांदरागड (खंडारगड / खांडरागड), चाळीसगाव, चोपडा, जामनेर, धरणगाव, पाचोरा, नशिराबाद, नगरदेवळे, वरणगाव, बहाळ, मुक्ताईनगर, बोदवड याठिकाणी सुद्धा भुईकोट / नगरकोट / गिरिदुर्ग आहेत.
दुर्ग आपली जबाबदारी
दुर्गांचे योग्य संवर्धन, स्वच्छता या गोष्टी महत्वाच्या आहेत. यासाठी आपला हातभार लागणे आणि खारीचा वाटा उचलणे ही आपली जबाबदारी आहे. शासकीय पातळीवरही संवर्धन सुरु आहेच. परंतु, आपण सर्व दुर्गप्रेमींनी राबविलेल्या स्वच्छता आणि संवर्धन मोहिमांमुळे या किल्ल्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते.
-------
संदर्भ :
१. डॉ. नि. रा. पाटील, किल्ले महाराष्ट्र-खंड-३: खान्देश-उत्तर महाराष्ट्र, सायन पब्लिकेशन्स प्रा.लि.
२. https://durgbharari.in/भटकंती/दुर्ग/जिल्ह्या नुसार#google_vignette
३. महेंद्र गोवेकर, नकाशातून दुर्गभ्रमंती, स्नेहल प्रकाशन
४. आनंद पाळंदे, डोंगरयात्रा, प्रफुल्लता प्रकाशन
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.