कारागृह हवालदाराच्या झडतीत देशी दारूची बाटली
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात तपासणीत उघड झाला प्रकार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड/ नाशिक, ता. ९ : येथील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा अंगझडतीत कारागृहाचाच हवालदार देशी दारूच्या बाटलीसह आढळून आला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत कारागृह हवालदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला; परंतु या प्रकरणी संशयित हवालदाराने फिर्यादी हवालदारावरच गंभीर आरोप केल्याने कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वादाच्या चर्चेला उधाण आले आहे.
यादव कचरू जाधव (वय ५७, रा. नाशिक रोड) असे संशयित कारागृह हवालदाराचे नाव आहे. सदरचा प्रकार १ नोव्हेंबरला सकाळी तपासणी करताना उघडकीस आला आहे. कारागृह हवालदार नागराज बाबूलाल आहिरे (५६) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित कारागृह हवालदार यादव जाधव कारागृहात कर्तव्यावर आले. त्यांची नियुक्ती कारागृहातील मेंटेनन्स व इतर कामांवर नियुक्त केलेल्या कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आलेली होती.
कारागृहातील पिकेट क्र. ०१ येथील मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी केली जात असते. रविवारी (ता. १) सकाळी साडेनऊच्या सुमारास कारागृहात नेमणुकीस असलेल्यांची अंगझडती घेतील जात होती. त्या वेळी हवालदार जाधव हे कारागृहात प्रवेश करीत असताना त्यांचीही नियमाप्रमाणे अंगझडती घेण्यात आली. त्या वेळी अंगझडतीत जाधव यांच्याकडे देशी दारूची सीलबंद बाटली आढळून आली. या प्रकरणाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेले असून, नाशिक रोड पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित हवालदार जाधव यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही देशी दारूची बाटली माझी नसून, फिर्यादी आहिरे यांनी ती माझ्या खिशात स्वतः ठेवली, असा दावा केल्याने यातून कारागृहातील कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत दुफळी समोर आली आहे. संशयित हवालदार व फिर्यादी हवालदार हे दोघेही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. जाधव यास दारूचे व्यसन असल्याचे बोलले जात आहे.
कडक तपासणीचा परिणाम
गेल्या काही दिवसांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ना त्या कारणांनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कारागृहात असलेल्या गुन्हेगारांनी मोबाईलमध्ये आतील चित्रण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकारानंतर कारागृहातील तपासणी अधिक कसून केली जात आहे. त्याचा परिणाम की काय, गेल्या आठवड्यात कारागृहाचा कर्मचारीच गुप्तांगांखाली चरस बाळगून कारागृहात प्रवेश करताना तपासणीत सापडला होता; तर आता थेट देशी दारूची बाटलीच कारागृहात नेताना पुन्हा कारागृहाचाच हवालदार अडकला आहे. कारागृह प्रशासनाने कडक धोरण अवलंबल्यानेच सदरचे गैरप्रकार उघडकीस येत असल्याचे बोलले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.