जैन इरिगेशनचा सुपरक्रिटिकल कंपनीबरोबर करार
उपशीर्षक
पर्यावरणपूरक पाऊल; १९ हजार टन बायोचार कार्बन क्रेडिट्सचा करणार पुरवठा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३० : जैन इरिगेशन सिस्टीम्सने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कार्बन रिमूव्हल मार्केटप्लेस सुपरक्रिटिकलबरोबर एक धोरणात्मक करार केला आहे. या करारांतर्गत जैन इरिगेशन २०२६-२७ या कालावधीत तब्बल १९ हजार टनांपर्यंतच्या ‘बायोचार कार्बन रिमूव्हल क्रेडिट्स’चा पुरवठा करेल.
हा करार म्हणजे कंपनीतर्फे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. हे कार्बन क्रेडिट्स जैन इरिगेशनच्या जळगाव येथील अत्याधुनिक औद्योगिक बायोचार प्रकल्पातून तयार केले जातील. या प्रकल्पात शेतीचा कचरा आणि अन्न प्रक्रिया उद्योगातून निघणाऱ्या अवशेषांवर ‘गॅसिफिकेशन’ प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते. यातून ‘बायोचार’ (एक प्रकारचा कोळसा) तयार होतो, जो जमिनीत गाडल्यास हवेतील घातक कार्बन अनेक शतकांपर्यंत जमिनीत सुरक्षित लॉक करून ठेवतो. यामुळे पर्यावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होते.
शाश्वत आणि पर्यावरणपूरक मॉडेल
प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सर्व घटकांचा पुनर्वापर केला जातो. प्रक्रियेदरम्यान तयार होणारा ‘सिनगॅस’ (Syngas) जैन इरिगेशनच्या कारखान्यांमध्ये जीवाश्म इंधनाचा (Fossil Fuel) पर्याय म्हणून वापरला जातो, तर तयार झालेला बायोचार कंपनीच्या कृषी व्यवसायांमध्ये आणि स्थानिक शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी दिला जातो.
सहा दशकांच्या विश्वासाची भक्कम साखळी
सुपरक्रिटिकल कंपनीचे पुरवठा व्यवस्थापक स्टीव्ह मॉरिन यांनी सांगितले, की इतर कंपन्यांना बायोचार प्रकल्पांसाठी पुरवठा साखळी शून्यातून उभी करावी लागते. मात्र, जैन इरिगेशनकडे ६० वर्षांहून अधिक काळचे मजबूत नेटवर्क आणि एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांचा आधार आहे. जैन इरिगेशन ही जगातील सर्वांत मोठी मँगो प्रोसेसिंग (आंबा प्रक्रिया) कंपनी आणि दरवर्षी १५ कोटी रोपांची निर्मिती करणारी टिश्युकल्चर नर्सरी चालविते. त्यामुळे त्यांना कच्चा माल आणि वितरणासाठी कोणतीही अडचण नाही.
बाजारात वाढती मागणी
सुपरक्रिटिकलच्या ताज्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर उच्च दर्जाच्या बायोचार क्रेडिट्सची मागणी प्रचंड वाढली आहे. २०२६ च्या एकूण उपलब्ध कोट्यापैकी ८१ टक्के कोटा जुलैमध्येच बुक झाला होता, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन महिने आधीच संपला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.