शेतीच्या वीजयंत्रणेला मिळणार बळ
दुष्काळसदृश परिस्थितीत रोहित्र, एसडीटी व कपॅसिटर बँक बसविणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाने वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून २० कोटी रुपयांपर्यंतचा विशेष निधी व एक हजार रोहित्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही गरजेनुसार एक हजार नवीन रोहित्रे, विशेष क्षमतेची रोहित्रे आणि कपॅसिटर बँक बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती सिंचनासाठी वीजपंपांवर अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या काळात तसेच पावसाने ओढ दिल्यास विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांमधून पाणी उपसण्यासाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक ठरतो. मात्र, काही भागांत रोहित्रांवर वाढलेला भार, तांत्रिक बिघाड तसेच लांब पल्ल्याच्या वीजवाहिन्यांमुळे कमी दाबाची समस्या निर्माण होते. शासनाच्या या निर्णयामुळे अशा अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत.
नवीन रोहित्र, वीज यंत्रणा
विशेष निधीतून अतिभारित अथवा नादुरुस्त रोहित्रांच्या जागी नवीन वितरण रोहित्रे बसविण्यात येतील. कृषी वीजवाहिन्यांवरील शेतातील घरे तसेच घरगुती ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यकतेनुसार सिंगल फेज आणि थ्री फेज स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मरही बसविले जाणार आहेत. याशिवाय लांब अंतराच्या वीजवाहिन्यांवर कमी दाबाची समस्या असलेल्या ठिकाणी कपॅसिटर बँक बसवून वीजदाब सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
चौकट
अंदाजपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
या कामांसाठी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गरजांचा आढावा घेऊन महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून अंदाजपत्रके तयार केली जाणार आहेत. ही प्रस्तावित कामे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कामांच्या मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.