टुडे एक ॲंकर
---
(जळगाव जिल्हा परिषदेचा संग्रहित फोटो वापरावा)
सिंचन कामांची प्रत्यक्ष पडताळणी; दुरुस्तीसाठी डीपीआर
(उपशीर्षक)
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे नियोजन; ३,८८५ कामांची करणार तपासणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने शेती आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासह सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात झालेल्या ३ हजार ८८५ कामांचे प्रत्यक्ष पडताळणी (ऑडिट) करून त्यातून आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणांची कामे निश्चितीनंतर डीपीआर तयार केला जाणार आहे.
यंदा पावसाळा कमी झाला असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे चित्र आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यामुळे दुष्काळ निवारणासाठी सिंचनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, ही कामे ‘मिशन मोड’वर राबविण्यात येत आहेत. उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रभावी वापर, सिंचन सुविधांमधील त्रुटी दूर करणे आणि पाणी अडविण्याची क्षमता वाढविणे यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
जलसंधारणावर भर
अनेक गावांमधून लहान नद्या आणि नैसर्गिक जलप्रवाह गेलेले असतात. लहान नद्या बारमाही वाहत नसल्याने त्यांच्या पात्रांमध्ये झुडपे आणि काटेरी वनस्पती वाढतात. अशा ठिकाणी अडथळे दूर करून नदीपात्राची स्वच्छता आणि खोलीकरण करण्याच्या विचाराधीन प्रशासन आहे. तसेच, योग्य ठिकाणी लहान बंधारे किंवा जलधारणा संरचना उभारल्यास पाणी अडविण्यास आणि त्याचा निचरा नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. यासाठी आवश्यक कामे निश्चित करून ती हाती घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सीईओ नायर यांनी सांगितले.
जुन्या कामांची तपासणी
दुष्काळाचा सामना करण्यासाठी नवीन कामे हाती घेण्याऐवजी यापूर्वी झालेल्या कामांचा प्रत्यक्षात किती उपयोग होतो, याची तपासणी करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३ हजार ८८५ कामांचे फिजिकल ऑडिट केले जाणार आहे.
इन्फो
दुरुस्ती-सुधारणांसाठी अहवाल
दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे. अशा वेळी जुन्या सिंचन कामांचे ऑडिट, आवश्यक दुरुस्ती- सुधारणा आणि लहान नद्यांमधील जलसंधारणाची कामे यांची सांगड घालण्याचे नियोजन आहे. हा डीपीआर जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल. मंजुरीनंतर संबंधित कामांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल.
–––––––
कोट
दुष्काळी परिस्थिती असून पाणीटंचाईचा प्रश्न देखील उद्भवू शकतो. त्यामुळे सिंचनाची कामे प्रामुख्याने केली जातील. आतापर्यंत झालेल्या सिंचनाच्या कामांचे ऑडिट करून डीपीआर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.
– करिश्मा नायर, सीईओ, जिल्हा परिषद, जळगाव.
––––––––