ॲंकर
(फ्लाय ९१ कंपनीचे विमान वापरावे)
---
जळगावकरांची नवी मुंबई विमानसेवेसाठी प्रतीक्षा
‘फ्लाय ९१’कडून अधिकृत घोषणा नाही; परवानग्यांची प्रक्रिया बाकी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : जळगावहून नवी मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची चर्चा सुरू असली, तरी ही सेवा तातडीने सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नवी मुंबई विमानतळावरील उड्डाणासाठी वेळ निश्चित होणे आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) परवानगी मिळणे बाकी आहे. त्यामुळे ही सेवा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जळगाव विमानतळाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून नवी मुंबई विमानसेवेबाबत माहिती घेतली. त्यावेळी कंपनीकडून सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकीटदर निश्चित झाल्याची चर्चा असली, तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. फ्लाय ९१ कंपनीकडून गेल्या अडीच वर्षांपासून जळगावहून गोवा, हैदराबाद आणि पुणे या शहरांसाठी विमानसेवा दिली जात आहे. कंपनीने आपल्या विमानांच्या ताफ्यात वाढ केली असून, जळगाव–नवी मुंबई मार्गावरही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, नवी मुंबई विमानतळावर उड्डाणासाठी स्लॉट मिळणे आणि डीजीसीएकडून आवश्यक परवानगी प्राप्त होणे या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. कंपनीच्या हिवाळी वेळापत्रकात या मार्गाचा समावेश होण्याची शक्यता असून, त्यामुळे जळगावकरांना नवी मुंबई विमानसेवेसाठी दिवाळीनंतर प्रतीक्षा करावी लागू शकते.
चौकट
‘एव्हिएशन फ्युअल पंप’ प्रस्तावित
जळगाव विमानतळावर ‘एव्हिएशन फ्युअल पंप’ (विमान इंधन भरणा केंद्र) देखील लवकरच सुरू होणार आहे. या पंपाची क्षमता तीस हजार लीटर असणार आहे. त्याबाबत मात्र डीजीसीएकडून परवानगी मिळणे अद्याप बाकी असून, परवानगीनंतरच पुढील कार्यवाही शक्य होईल. विमानाच्या इंधनासाठी हा पंप सोयीचा ठरणार असून, आणखी विमानफेऱ्या वाढण्यास मदत होणार आहे.