पान २ सेकंड मेन
NSK26H32102
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. शेजारी मंत्री संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, खासदार स्मिता वाघ, सीईओ करिश्मा नायर.
–––
शाळा-अंगणवाड्या उभारणीसाठी आराखडे तयार करा
(उपशीर्षक)
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश; आधुनिकीकरणाच्या नियोजनाला मान्यता
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत पक्क्या इमारती, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदर्श शाळा व अंगणवाड्या उभारण्यासाठी प्रमाणित आराखडे तयार करून कामांचे नियोजन करावे. तसेच लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन अत्यावश्यक कामे निश्चित करावीत, असे निर्देश पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज (ता. १२) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विशेष बैठक पार पडली. बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता मनोज पाटील आदी उपस्थित होते.
गरजेनुसार कामांचा प्राधान्यक्रम
पालकमंत्री पाटील म्हणाले, की आमदार व लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील शाळा आणि अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन सुविधांची पाहणी करावी. गरजेनुसार कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून प्रस्ताव तयार करावेत. जनसुविधेअंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘जळगाव पॅटर्न’ व्हावा
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळा व अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ग्रामीण शैक्षणिक सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला. आमदार किशोर पाटील यांनी हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणारा ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
इन्फो
नियोजनबद्ध आधुनिकीकरणाचा निर्णय
जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणाच्या नियोजनाला मान्यता देण्यात आली. त्यादृष्टीने सीईओ नायर यांनी प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले. यात शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार नवीन बांधकाम, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि अंगणवाड्यांमधील मूलभूत सुविधांसाठीचे आराखडे तयार करण्यावर भर देण्यात आला. कामांच्या दर्जात एकसमानता, निधीचा प्रभावी वापर आणि अंमलबजावणीत सुसूत्रता राहावी या दृष्टीने व्यापक नियोजनाला बैठकीत मान्यता देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.