टुडे पान ३, मेन फिचर
(घराच्या छतावरील सौर पॅनलचा फोटो वापरावा)
---
जिल्ह्यातील ६१ हजार घरांतून २३० मेगावॅट वीजनिर्मिती
परिमंडलात ९६ हजार घरांच्या छतांवर सौर प्रकल्प; सूर्यघर योजनेतून वीजबिलाचा भार कमी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून स्वतःची वीज निर्माण करण्याकडे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा कल वाढत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे या पर्यायाला मोठी चालना मिळाली असून, जिल्ह्यातील तब्बल ६१ हजार ५३५ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांची स्थापित क्षमता २३०.४६ मेगावॅट इतकी आहे. विशेष म्हणजे, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या जळगाव परिमंडलात एकूण ९६ हजार ६५५ घरांवर ३५७.९७ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
एकेकाळी घरांच्या छतांचा वापर पाण्याच्या टाक्या किंवा अडगळ ठेवण्यासाठी होत होता. आता याच छतांचा उपयोग वीज तयार करण्यासाठी केला जात आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक असलेली वीज स्वतः निर्माण करण्याची संधी या योजनेतून मिळत असल्याने ग्राहकांना पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करता येत आहे. परिणामी, दरमहा येणाऱ्या वीजबिलातही मोठी बचत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्षमतेनुसार अनुदान
या योजनेत केंद्र शासनाकडून सौर प्रकल्पाच्या क्षमतेनुसार अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६० हजार, तर तीन किलोवॅट आणि त्यापुढील क्षमतेच्या प्रकल्पासाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते. एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या संचातून दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीजनिर्मिती होऊ शकते.
ग्रामपंचायतींनाही प्रोत्साहननिधी
सौर प्रकल्प उभारणीसाठी बँकांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यास ती महावितरणच्या यंत्रणेत जमा होते आणि त्यानुसार रक्कम वीजबिलात समायोजित केली जाते. ग्रामीण भागात योजनेला प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींनाही प्रोत्साहन निधी देण्याची तरतूद आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.
जळगाव परिमंडलाची आकडेवारी अशी
जिल्हा............सौरप्रकल्प ग्राहक..........वीजनिर्मिती (मेगावॅट)
जळगाव..........६१ हजार ५३५..............२३०.४६
धुळे..............२४ हजार २६७...............८८.२७
नंदुरबार...........१० हजार ८५३...............३९.२३
कोट..
३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना उपयुक्त आहे. सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता,
महावितरण, जळगाव परिमंडल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.