जळगाव जिल्हा बँक निवडणूक (लोगो)
------
पालकमंत्री पाटील, जलसंपदामंत्री महाजनांसह बारा जागा बिनविरोध
---
आता ९ जागांसाठी २९ ला मतदान; आज चिन्हवाटप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (ता. १७) नाटयमय घडामोडी घडत आठ जागा व पूर्वीच्या चार, अशा एकूण १२ जागा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. बिनविरोध झालेल्यांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, जिल्हा बॅकेचे चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार, आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आदी १२ उमेदवारांचा समावेश आहे.
एकूण २४१ उमेदवारांनी ४०२ अर्ज दाखल केले होते. माघारीच्या अखेरच्या दिवशी एकूण २०० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. आता ४१ उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून, उमेदवारी देणे, माघारी घेण्यापर्यंत शह-कटशहाचे राजकारण झाले. महायुती असूनही अनेक भाजप विरुद्ध शिवसेनेने, तर काही ठिकाणी शिवसेनेविरुद्ध भाजपच्या इच्छुकांनी अर्ज भरले होते. यामुळे नेमके माघार कोण घेतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून होते.
जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत कायम
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचा जागावाटपाचा तिढा माघारीपर्यंत व नंतरही कायम राहिला. पालकमंत्री, जलसंपदामंत्री, आमदार व खासदारांच्या झालेल्या बैठकीत भाजपला १० जागा, शिवसेना सात आणि राष्ट्रवादी काँग्रेस चार, असा महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. मात्र, तो शेवटपर्यंत कायम राहिला. मुक्ताईनगरची जागा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला सोडण्यास नकार दिल्याने तेथे बंडखोरी झाली आहे.
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीला एक ते दोन जागा देऊ, असे सांगितले होते. मात्र, शेवटपर्यंत एकही जागा महाविकास आघाडीला सोडण्यात आली नाही. महायुतीने आमचा विशवास घात केला, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
---
भाजपचे बिनविरोध झालेले उमेदवार
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहित निकम, रजनी सावकारे व मधुकर राणे.
---
शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, सुमीत किशोर पाटील, मृणाल अमोल पाटील, नलिनी चिमणराव पाटील व
सोमसिंग खुमानसिंग पाटील.
---
राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनविरोध उमेदवार
सोनल संजय पवार, जयश्री अनिल पाटील.
---
या लढतींकडे लक्ष
मुक्ताईनगर विविध कार्यकारी मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे विरुद्ध शिवसेनेच्या देवयानी देशमुख व चाळीसगाचे आमदार मंगेश चव्हाण (भाजप) विरुद्ध शिवसेनेचे विजय पाटील व नारायण पाटील यांच्यात लढत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.