ॲंकर
NSK26H31737
जळगाव : कोर्टचेअर ॲपबाबत आयोजित कार्यशाळेत प्रशिक्षण घेणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे.
जळगाव पोलिस दलाची हायटेक आगेकूच
‘कोर्ट चेकर ॲप’चे पेड व्हर्जन कार्यान्वित; गुन्हेगारांवर ठेवणार बारकाईने लक्ष
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हेगाराची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसदल आता प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. गुन्हेगारी नियंत्रणासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसदलाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून, ‘कोर्टचेकर ॲप’ जिल्हाभर कार्यान्वित केले आहे. या माध्यमातून २४ तास गुन्हे व गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हेगारी नियंत्रणासाठी जळगाव पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा व वाहतूक शाखेसाठी ‘कोर्ट चेकर ॲप’चे ५० पेड व्हर्जन दोन वर्षांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना यापूर्वीच एक डेडिकेटेड सिम नंबर आणि टॅब देण्यात आले असून, आता या ॲपमुळे पोलिस यंत्रणा अधिक गतिमान आणि पारदर्शक होणार आहे.
आधुनिक पोलिसिंग
आधुनिक पोलिसिंगमध्ये गुन्हा दाखल करणे किंवा आरोपीला अटक करण्यासोबतच न्यायालयीन प्रक्रियेची माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. ‘कोर्ट चेकर ॲप’मुळे आरोपी व गुन्ह्यांची न्यायालयीन स्थिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
ॲपचे प्रमुख फायदे व वैशिष्ट्ये
‘कोर्ट चेकर ॲप’मुळे आरोपीविरुद्ध दाखल गुन्हे, प्रलंबित प्रकरणांची सद्यःस्थिती, जामीन तसेच न्यायालयीन कोठडीची माहिती मिळणार आहे. फरार व सराईत आरोपींचा शोध घेणे सुलभ होईल. गुन्ह्यांची न्यायालयीन स्थिती, पुढील सुनावणीच्या तारखा आणि आरोपपत्र दाखल झाले की नाही, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष ठेवता येईल. तपासी अधिकारी, कोर्ट पैरवी अधिकारी व सरकारी वकिलांमध्ये समन्वय साधता येईल. सर्व माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्याने वेळ वाचेल. आरोपींच्या न्यायालयीन इतिहासाच्या आधारे प्रतिबंधात्मक कारवाई करणेही सुलभ होणार आहे.
चौकट
स्मार्ट आणि डिजिटल पोलिसिंग
''कोर्ट चेकर ॲप'' हे केवळ न्यायालयीन नोंदी पाहण्याचे साधन नसून ते गुन्हेगारी शोध आणि तपासाचे एक आधुनिक माध्यम आहे. गुन्ह्यांची माहिती, क्रिमिनल इंटेलिजन्स,कोर्ट डेटा या सर्वांचा एकत्रित वापर करून जळगाव पोलिस आता अधिक प्रभावीपणे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतील.