NSK26H32551
जळगाव : गेंदालाल मिल परिसर साचलेला कचरा.
--------------
NSK26H32552
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कॉर्नरजवळ पडलेला कचरा.
------------
(छायाचित्र : संधिपाल वानखेडे)
------------
बीव्हीजी कर्मचाऱ्याचा संप कायम; शहरात कचऱ्याचे ढीग
शहरात ४०० टन कचरा साचल्याचा अंदाज; बैठकीनंतरही प्रश्न अनुत्तरित, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने बीव्हीजी कंपनीने पुकारलेले काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने जळगाव शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून, दैनंदिन स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका प्रशासन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊनही थकीत बिलाच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बैठकांवर बैठका होत असताना प्रत्यक्षात कचरा संकलन कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संप तिसऱ्या दिवशीही कायम राहिल्यास शहरातील स्वच्छतेची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीचे सुमारे ५०० कर्मचारी वेतनाअभावी कामावर आलेले नाहीत. परिणामी, घंटागाड्या, कॉम्पॅक्टर आणि अन्य वाहने वाहनतळावरच उभी आहेत. दोन दिवसांत शहरात सुमारे ३०० ते ४०० टन कचरा साचल्याचा अंदाज आहे. सणासुदीच्या काळात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.
बैठक झाली; मात्र तोडगा नाही!
कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कंपनीच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका व बीव्हीजीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. मात्र, चर्चेचा भर प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदी, जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक अडचणी आणि कामकाजातील त्रुटींवरच राहिला. कंपनीचे सुमारे २० कोटी रुपयांचे बिल मार्चपासून थकीत असल्याचे सांगितले जात असताना, या आर्थिक प्रश्नावर ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी, संप मिटण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.
मनपाच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार
बीव्हीजीचे कर्मचारी संपावर असल्याने महापालिकेच्या कायमस्वरूपी सुमारे ४५० सफाई कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या अखत्यारीतील प्रभागांमध्ये स्वच्छता केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू असल्याने तेथील स्वच्छतेची जबाबदारीही मनपाच्या एका पथकाला पार पाडावी लागत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न ऐरणीवर
कंपनीची थकीत देयके, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि स्वच्छतेतील त्रुटी यांवर प्रशासन व कंपनीने समन्वयातून तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे. अन्यथा रस्तोरस्ती साचणारा कचरा, दुर्गंधी आणि संभाव्य आरोग्यधोका वाढण्याची शक्यता आहे. बैठकींचे सत्र सुरू असताना शहराची स्वच्छता मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.