‘कादवा’साठी ९ कोटींच्या कर्जाचा मार्ग मोकळा
जमीन तारणास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी : कारखान्याची १०२ हेक्टर जमीन तारण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : कादवा सहकारी साखर कारखान्याला गळीत हंगामातील खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी ९ कोटींचे कर्ज उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कर्जासाठी कारखान्याच्या मातेरेवाडी येथील १०२ हेक्टर ८६ आर क्षेत्रफळाची जमीन तारण ठेवण्यास अपर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कृषी औद्योगिक विभागाकडून हे कर्ज घेतले जाणा असून, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश काढले आहेत.
कादवा कारखान्याने गळीत हंगामात खेळत्या भांडवली खर्चासाठी कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी मातेरेवाडी येथील कारखान्याच्या ताब्यातील भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे ६ गट तारण ठेवण्याची परवानगी मागण्यात आली होती. दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत या प्रस्तावाची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १९ ऑक्टोबर २०२६ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तारणास मंजुरी दिली.
शासन निर्णयानुसार औद्योगिक प्रयोजनासाठीच्या कर्जावर ०.५० टक्के दराने तारण शुल्क आकारण्यात येते. त्यानुसार कारखान्याने ९ कोटींच्या कर्जासाठी साडेचार लाखांचे तारण शुल्क शासकीय कोषागारात जमा केले. संबंधित चलनाच्या प्रतीसह अहवाल सादर केला होता. तारण जमिनीचा वापर मूळ मंजूर औद्योगिक प्रयोजनाव्यतिरिक्त अन्य कारणासाठी करता येणार नाही. शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय जमिनीची विक्री, लिलाव अथवा हस्तांतरण करता येणार नाही, अशा अटी आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.
---
१६-१
सातबाऱ्यावर कर्जाची नोंद
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मातेरेवाडी येथील गट क्रमांक ३२८ (१८ हेक्टर ७९ आर), ३२९ (१८ हेक्टर ९३ आर), ३३० (२१ हेक्टर ७३ आर), ३३१ (१९ हेक्टर २८ आर), ३३२ (१२ हेक्टर १० आर) आणि ३३३ (१२ हेक्टर ३ आर) अशा एकूण सहा गटांतील १०२ हेक्टर ८६ आर जमीन तारण ठेवता येणार आहे. या जमिनीचे २०२५-२६ मधील एकूण मूल्यांकन १५४ कोटी ४४ लाख ८० हजार रुपये आहे. या आदेशाची नोंद संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कांमध्ये घेण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.
-----------------