कालिका देवी मंदिरात
आज अष्टमीचे होमहवन
यात्रोत्सव आज गर्दीने फुलणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : श्री संस्थान कालिकादेवी मंदिरात सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी (ता. १८) सायंकाळी ४ वाजता मंदिराच्या प्रांगणात अष्टमीचे होमपूजन व होमहवन करण्यात येणार आहे. मंदिर संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते हा धार्मिक विधी पार पडणार आहे. आज रविवार असल्याने कालिका माता यात्रोत्सवात गर्दीचा उच्चांक पहायला मिळणार आहे.
उत्सवाच्या काळात आतापर्यंत हजारों भाविकांनी देवीचे दर्शन घेतले असून, मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दररोज भजन, कुंकुमार्चन, तसेच रात्री देवीचे जागरण आणि गोंधळ यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दाते पंचांगानुसार, रविवारी सकाळी साडेआठ वाजता अष्टमी तिथी सुरू होत असून, सोमवारी (ता. १९) सकाळी समाप्ती होणार आहे. अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथींचा कालावधी एकाच दिवशी येत असल्याने रविवारी सायंकाळी अष्टमीचे होमपूजन व होमहवन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात अष्टमीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. देवीच्या उपासनेतील हा दिवस शक्तीची आराधना, श्रद्धा आणि भक्तिभावाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी होम-हवन करून देवीला आहुती अर्पण केली जाते. दरम्यान, शनिवारी दर्शनासाठी भाविक व यात्रेमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. पाळणे, खेळण्यांची दुकाने तसेच खाण्यापिण्याचे स्टॉल्स यामध्ये अधिक गर्दी पहावयास मिळाली.