कळवण, मानूर येथे चार ठिकाणी घरफोडी
तीन लाख ८१ हजारांचा मुद्देमाल लंपास, रात्रीची गस्ती वाढविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. ६ ः कळवण शहर व परिसरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुकाने आणि दोन घरांचे कुलूप तोडून एकूण तीन लाख ८१ हजारांच्या रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळवण पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अडीच ते पहाटे सहाच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडीची मालिका घडवून आणली. कळवण शहरातील गांधी चौक परिसरातील अंबिका पतसंस्थेजवळील कमलेश सोमनाथ कोठावदे यांच्या कापड दुकानाच्या गल्ल्यातून ७० हजार रुपये, सुभाष पेठेतील प्रथमेश उर्फ स्वामी कैलास देवघरे यांच्या कापड दुकानातून दोन हजार रुपये आणि शिवाजीनगर येथील राकेश शिवाजी आहेर यांच्या घराच्या कपाटातून नऊ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
त्याच रात्री मानूर येथे राहणारे शेतकरी राजेंद्रनाथ पंढरीनाथ पवार आणि त्यांच्या नातेवाइकांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे डोरले, झुबे, एकदाणी पोत, रिंगा, दोन अंगठ्या, चांदीचे ग्लास व कॉइन, सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन पाटल्यांसह रोख रक्कम असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल पळवून नेला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव शेळके, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक ठोंबरे आणि नाशिक ग्रामीण येथील ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेश कोठावदे यांच्या फिर्यादीवरून पोलिस हवालदार प्रशांत तिडके आणि राजेंद्रनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक निशांत अहिरे तपास करत आहेत. एकाच रात्री घडलेल्या या चार घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.