कसारा रेल्वे मार्गावर १२ दिवसांचा ब्लॉक
तिसऱ्या मार्गिकेच्या कामामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता.७ : आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प तसेच कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाइन विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने कसारा येथे ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत प्री-नॉन-इंटरलॉकिंग, नॉन-इंटरलॉकिंग आणि पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जात आहेत. त्यामुळे उपनगरीय लोकलसह मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
या प्रकल्पामुळे मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय रेल्वे सेवांची वाहतूक स्वतंत्र करण्यास मदत होणार असून, भविष्यात अतिरिक्त गाड्या चालविण्याची क्षमता वाढणार आहे. तसेच गाड्यांच्या परिचालनात अधिक लवचिकता आणि सुरळीत नियमन शक्य होणार आहे.
पाच मेल-एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल
ब्लॉकमुळे पाच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ८ ऑक्टोबरची लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्स्प्रेस आता ९ ऑक्टोबरला ४ वाजता, एलटीटी-पाटलिपुत्र एक्स्प्रेस ४.१५ वाजता आणि सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस ४ वाजता सुटेल. ९ ऑक्टोबरची सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस ४.१५ वाजता, तर एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस ४.३० वाजता सुटेल.
इगतपुरी, खर्डी व आटगाव येथे गाड्यांचे नियमन
ब्लॉकच्या काळात काही गाड्यांना इगतपुरी, खर्डी आणि आटगाव येथे थांबवून नियमन केले जाणार आहे. गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, गोमतीनगर-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, अयोध्या कँट-एलटीटी एक्स्प्रेस, बलिया-दादर एक्स्प्रेस आणि शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचे इगतपुरी येथे नियमन करण्यात येईल.
दादर-गोरखपूर एक्स्प्रेसला ८ ऑक्टोबरला खर्डी येथे एक तास, तर एलटीटी-राजगीर एक्स्प्रेसला आटगाव येथे ३० मिनिटे थांबविण्यात येईल.
अनेक गाड्यांना विलंबाची शक्यता
भुसावळ विभागात काही गाड्यांचे ३० मिनिटांपासून १ तास २५ मिनिटांपर्यंत नियमन करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम म्हणून वंदे भारत, कामायनी, अमृतसर, कुशीनगर, जयनगर, गोरखपूर, सीतापूर, धनबाद आदी मार्गांवरील अनेक गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. ८ ऑक्टोबरला सेवाग्राम, नंदीग्राम आणि सीएसएमटी-हावडा दुरंतो एक्स्प्रेसच्या वेळेवरही परिणाम होईल. तसेच ८ व ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री गोरखपूर-एलटीटी, नंदीग्राम, उद्योगनगरी, गया-एलटीटी सुपरफास्ट आणि अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.