खडसे फार्म हाऊस रेकी प्रकरण
--------------
ते ड्रोन नव्हे तर प्रशिक्षणार्थी विमान
विमान प्राधिकरणासह तांत्रिक माहिती संकलनाचा निष्कर्ष
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१० : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर ड्रोनद्वारे रेकी आणि चित्रीकरण केल्याच्या प्रकरणात पोलिस दलाने प्रसिद्धीपत्रकान्वये महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच तक्रारदार खडसे यांनी सादर केलेल्या व्हिडीओ चित्रीकरणाचे संदर्भासह स्पष्टीकरण देण्यात आले. खडसे यांच्या फार्महाऊसवर फिरणारे ड्रोन नसून जळगाव विमानतळावरून बाळापूरच्या दिशेने अमरावतीकडे जाण्यासाठीचे प्रशिक्षण विमान असल्याचे विमान प्राधिकरणाने स्पष्ट केले.
आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर २८ सप्टेंबरला संध्याकाळी ७.५० ते ८.१५ या वेळेत त्यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर व्यक्तींकडून ड्रोनद्वारे रेकी किंवा चित्रीकरण करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी तक्रार दाखल करत केली होती. खडसेंच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिस दलाने चौकशीला सुरवात केली. चित्रीकरणात नमुद दृश्य नेमके कशाचे होते, संबंधित वेळेत परिसरातून विमान गेले होते का? आणि तक्रारीतील संशयाला कोणते पुरावे आहेत,याची खातर जमा पोलिसांतर्फे करण्यात आली.
खडसे यांच्या तक्रारीतील वेळ आणि घटनेचे स्वरूप लक्षात घेता पोलिसांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या जळगाव विमानतळ प्रशासनाशी तसेच संबंधित विमान प्रशिक्षण संस्थांशी पत्रव्यवहार केला. नमुद चित्रीकरणाच्या चौकशीत जळगाव विमानतळाचे निर्देशक हर्षकुमार त्रिपाठी, मुख्य सुरक्षा अधिकारी हेमंत गौतम, एअरक्राफ्ट फिट-टू-फ्लायचे व्यवस्थापक महेंद्रकुमार सिंह आणि संबंधित विमानतळ अधिकाऱ्यांशी पोलिसांनी चर्चा केली. खडसे यांनी उपलब्ध करून दिलेला व्हिडिओ देखील संबंधित अधिकाऱ्यांना दाखविण्यात आला. व्हिडिओतील दृश्यांचे निरीक्षण केल्यानंतर ते दृश्य ड्रोनचे नसून जळगाव विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाचे असल्याचे मत संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जळगाव विमानतळावर दोन विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था (फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स) कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत बाळापूर आणि अमरावती परिसराच्या दिशेने नियमित प्रशिक्षण उड्डाणे केली जात असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
--
तांत्रिक माहिती संकलन
विमानतळ प्रशासनाच्या माहितीवर अवलंबून न राहता पोलिसांनी प्रत्यक्ष चौकशी केली. त्याचबरोबर विमानांच्या हालचालींची माहिती देणाऱ्या प्लेन फाइंडर ॲपवरील उपलब्ध नोंदींचीही तपासणी करण्यात आली. या नोंदींच्या पडताळणीत संबंधित वेळेच्या सुमारास त्या परिसरातून विमान जात असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीत नमूद तारीख व वेळ, विमानतळ प्रशासनाचे अभिलेख, आदींच्या आधारे ते, ड्रोन नसून प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.