कुंभमेळ्याचे श्रमिक ठरणार
आतिथ्य संस्कृतीचे दूत
-----------------------
१,५०० प्रशिक्षण सत्रांचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१ : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांचे स्वागत आपुलकी, प्रामाणिकपणा आणि सेवाभावातून व्हावे, या उद्देशाने दिशा फाउंडेशन आणि श्रमगौरव यांच्या वतीने ‘अतिथी सेवा अभियान’ सुरू करण्यात आले आहे.
‘सेवा, सन्मान’ या मूलमंत्रावर आधारित या उपक्रमातून नाशिकच्या आतिथ्य संस्कृतीचे खरे प्रतिनिधी असलेल्या श्रमिकांना सक्षम करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यात वाहनचालक, हॉटेल कर्मचारी, रस्त्यावरील विक्रेते, सफाई कर्मचारी, घरगुती कामगार आणि आरोग्यसेवक यांचा भाविकांशी थेट संपर्क येणार आहे. त्यामुळे त्यांच्या वर्तनातून नाशिकची प्रतिमा घडणार आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम, विशेष प्रशिक्षण, ‘नाशिक कुंभ चॅम्पियन्स’ची निर्मिती आणि क्यूआर कोडद्वारे अभिप्राय संकलन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. योग्य दर आकारणे, पारदर्शक व्यवहार, स्वच्छता, भाविकांची दिशाभूल व आर्थिक शोषण टाळणे आणि गरजेच्या वेळी मदत करणे, याबाबत श्रमिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शहरातील ५० हजारांहून अधिक फ्रंटलाइन श्रमिकांपर्यंत पोहोचण्याचे अभियानाचे उद्दिष्ट असून, सुमारे १,५०० प्रशिक्षण सत्रांचे नियोजन आहे. कुंभमेळा हा सामाजिक परिवर्तनाची संधी आहे. भाविकांना सन्मान, सुरक्षितता आणि आपलेपणा अनुभवता यावा, तसेच श्रमिकांना आपल्या कामाचा अभिमान वाटावा, हा अभियानाचा हेतू असल्याचे दिशा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अंजली बोऱ्हाडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.