सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण लेख (महापालिका आयुक्त मनीषा खत्री)
---------------------------
सुरक्षित, स्मार्ट शहराचा पाया
लीड
नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व पौराणिक, धार्मिक तर आहेच; परंतु २०२७ चा कुंभमेळा नाशिकच्या सुरक्षित, स्मार्ट शहराची पायाभरणीही आहे. कुंभमेळ्याचे महत्त्व व संभावित गर्दी लक्षात घेऊन शासनाने भरघोस आर्थिक मदत दिली. त्यातून या शहराला धार्मिकतेबरोबरच आधुनिक जगाशी जोडणाऱ्या पायाभूत सुविधाही उपलब्ध होणार आहे. पायाभूत सुविधा पुरविताना भविष्यातील ४० वर्षांचा विचार करून नियोजन करण्यात आले.
- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक
---------------
म हापालिकेने हाती घेतलेला रामकाल पथ हा केवळ सुशोभीकरणाचा प्रकल्प नाही, तर नाशिकच्या श्रद्धा, वारसा आणि कुंभमेळ्याच्या भविष्याचा एकात्मिक विकास आराखडा आहे. गोदावरी नदीच्या काठावरील नाशिकच्या मध्यवर्ती वारसा क्षेत्राला (कोअर हेरिटेज प्रिसिंक्ट) तो नवे रूप देईल. रामतीर्थ, काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, सीतागुंफा आणि या परिसरातील सर्व वारसा रस्ते, घाट आणि सार्वजनिक जागा यांचा एकात्मिक विकास यातून साध्य होणार आहे. नाशिककरांसाठी रामकाल पथ अभिमानाचा ठरेल. या प्रकल्पामागील प्रेरणा आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची. ज्याप्रमाणे अहिल्याबाईंनी देशभरात घाट, मंदिरे आणि सामान्य भाविकांसाठी सार्वजनिक सुविधा निर्माण केल्या, त्याच मार्गदर्शक तत्त्वावर घाटांचा विकास केला जात आहे. प्रकल्पात वारसा मंदिरांचे जतन, घाटांकडे जाणारे रस्ते आणि पार्किंगला जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण व बळकटीकरण, जुन्या घाटांचा वारसा जपत दुरुस्ती, जुन्या स्वच्छतागृहांऐवजी आधुनिक स्वच्छतागृहे आणि चेंजिंग रूम, पादचाऱ्यांसाठी समर्पित वॉक-वे, रॅम्प, रेलिंग आणि दिव्यांगांसाठी टॅक्टाइल पथ यांचा समावेश आहे. प्रकल्प राबविताना बाधितांचे योग्य पुनर्वसन करून शून्य विरोधात राबविण्याचे कौशल्य साधले. हा मार्ग केवळ भाविकांसाठीच नाही, तर पुढील पिढ्यांसाठी नाशिकला अधिक मजबूत करणारा ठरणार आहे.
-----------------------
‘गोदावरी’ स्वच्छतेचे उद्दिष्ट
रामकाल पथ प्रकल्पांतर्गत ‘क्लीन गोदावरी- झीरो सीवेज’ या तत्त्वानुसार घाट परिसरातील सांडपाणी थेट नदीत जाणार नाही, याची व्यवस्था केली जात आहे. त्याचबरोबर उच्च व कमी दाबाच्या विजेच्या तारा भूमिगत केल्या जात आहेत. कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीचे जाळे आणि रात्रीच्या पर्यटकांसाठी हेरिटेज वास्तूंवर प्रक्षेपण चित्रणाची योजना आहे.
------------------------
गळतीमुक्त, पारदर्शक जलवाहिनी व्यवस्था
नाशिककरांना पुढील ३० वर्षे मुबलक आणि गळतीमुक्त पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने पाणीपुरवठा नेटवर्क हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प केवळ कुंभमेळा २०२७ पुरता नसून, शहराच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला. भविष्याचा विचार करता शहराची पाण्याची मागणी २०४० पर्यंत ५८३ एमएलडी आणि २०५५ पर्यंत ८८३ एमएलडीपर्यंत जाणार आहे. विल्होळी येथे भविष्यातील ट्रीटमेंट प्लांट कुंभमेळ्यासाठी प्रत्यक्षात १५० एमएलडी क्षमतेची गरज असताना महापालिकेतर्फे विल्होळी येथे २७४ एमएलडी क्षमतेचा अत्याधुनिक, पूर्णपणे स्काडा प्रणालीने स्वयंचलित असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी ३९५.७७ कोटी रुपये खर्च येत आहे. नाशिकमधील सर्व जलशुद्धीकरण प्रकल्पांची एकूण क्षमता ९३५ एमएलडी इतकी होईल. अमृत नेटवर्कच्या निविदेत १० टक्के म्हणजे ३४२.५३ कोटींच्या कामात बचत करण्यात महापालिकेला यश मिळाले. विल्होळी प्रकल्पातही पाच टक्के बचत झाली. ५० वर्षे टिकणारी पाइपलाईन शहरातील २२० किलोमीटर जुनी, गळकी पाइपलाईन काढून, त्या जागी माइल्ड स्टील आणि डक्टाईल आयर्नचे पाइप टाकले जात आहेत, ज्यांचे आयुष्य ५० वर्षे आहे.
--------------------
डिजिटल कवच
स्मार्टसिटी उपक्रमांतर्गत शहर आणि त्र्यंबकेश्वरसाठी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स आणि ओएफसी नेटवर्क हा एकात्मिक डिजिटल पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प केवळ गर्दी व्यवस्थापनापुरता नसून, यानंतरही शहराच्या कायमस्वरूपी सुरक्षेसाठीची गुंतवणूक आहे. प्रकल्पांतर्गत चार हजार ११ (बुलेट, पीटीझेड आणि एएनपीआर प्रकारचे) कॅमेरे बसविले जातील. नाशिक शहरात ५२८ लोकेशन्सवर एक हजार ८५१ कॅमेरे, तर त्र्यंबकेश्वर परिसरात ३१६ लोकेशन्सवर एक हजार १५० कॅमेरे बसविले जात आहेत. विशेष म्हणजे एका खोदकामात दोन नेटवर्क तयार होत आहेत. यामुळे वारंवार रस्ते खोदावे लागणार नाहीत. कॅमेऱ्यांसाठी लागणाऱ्या फायबर स्ट्रँडपेक्षा जास्त क्षमतेचे फायबर टाकले जात असून, ती अतिरिक्त क्षमता भविष्यातील स्मार्टसिटी सेवांसाठी आणि मोनेटायझेशनसाठी राखीव ठेवली आहे. यातून महापालिकेला वर्षाला सुमारे पाच कोटी रुपयांच्या महसुलाची क्षमता आहे. सुरक्षित डेटा नेटवर्क व कॅमेरा आधारित गर्दी व्यवस्थापन हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. हेच नेटवर्क भविष्यात २४ तास शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि चौकांवर लक्ष ठेवेल. कुंभासाठी उभारलेली ही यंत्रणा नाशिककरांसाठी कायमस्वरूपी सुरक्षित आणि स्मार्ट शहराचा पाया ठरणार आहे.
-----------------------------------
रस्त्यांची ४० वर्षांची सोय
रस्ते विकास प्रकल्प पुढील ४० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेला आहे. ११८ किलोमीटरचे ३१ रस्ते या प्रकल्पांतर्गत विकसित केले जात आहेत. ३१ पैकी २७ रस्त्यांचे रुंदीकरण होत आहे. महापालिकेने प्रमुख धमनी आणि शहरांतर्गत रस्त्यांचा पुनर्विकास केवळ कुंभासाठी नव्हे, तर नाशिककरांसाठी केला आहे. रस्ते वारंवार खोदले जाऊ नये, यासाठी सर्व युटिलिटीज एकत्र टाकल्या जात आहेत. ओएफसी केबल, एमएनजीएल गॅस लाइन, वीजवाहिन्या, जलवाहिन्या, मलजलवाहिन्या टाकल्या जात आहेत. अवजड वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्र, मार्केट यार्डमध्ये काँक्रीट रस्ते, शहरातील हलक्या वाहनांची; पण दाट वाहतूक असलेल्या भागात डांबरी रस्ते याप्रमाणे नियोजन केले जात आहे. भविष्यात ‘नाशिक पॅटर्न’ म्हणून रस्त्यांची ओळख होईल. दरवर्षी दोन काँक्रीट रस्ते बांधण्याची पद्धत महाराष्ट्रात केवळ नाशिकमध्येच अमलात आणली आहे. पुढील तीन वर्षांत सर्व औद्योगिक रस्ते काँक्रीट करण्याचे उद्दिष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.