धुळे ः टुडे १ साठी, संक्षिप्त
---
फोटो क्रमांक ः ३५०२४
धुळे ः विविध मागण्यांसाठी आंदोलन करताना मनेष हाके व सहकारी.
---
अजनाड जमीन वाद;
हाके यांचे आंदोलन
धुळे ः अजनाड (ता. शिरपूर) येथील गट नंबर २२१ मधील शेतजमीन प्रकरणी न्याय मिळावा आणि प्रशासकीय अनियमिततेची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मनेष श्रीकृष्णा हाके यांनी शुक्रवार (ता. १३)पासून येथील क्युमाईन क्लबजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंगळवार (ता. १७)पासून त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी ९ जूनला तहसीलदारांनी दिलेला आदेश रद्द करावा, बनावट कागदपत्रे व महसुली नोंदीतील फेरफारसंबंधी आरोपांची, तसेच तत्कालीन तहसीलदारांसह संबंधित तलाठी, मंडळाधिकाऱ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलक हाके यांनी केली आहे. यात फेरफार क्रमांक ५३२० ची प्रक्रिया, तसेच कुळ कायद्यातील ३२ एच व ३२ एम यासंदर्भातील कागदपत्रांची निष्पक्ष तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत व्हावी, मागणीही आंदोलक हाके, कोकिळाबाई पाटील, देवीदास हटकर, अनिल हटकर, जनाबाई हटकर, दिनेश हटकर, राधाबाई हटकर, जिजाबाई वाघमोडे, शिवाजी हटकर, बाळू हटकर आदींनी केली आहे.
---
कुळथेत विषबाधेने
शेतकऱ्याचा मृत्यू
धुळे ः कपाशीवर किटकनाशकाची फवारणी करताना विषारी औषध नाका-तोंडात गेल्याने प्रकृती बिघडलेल्या ४२ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्याम तुळशीराम कदम (रा. कुळथे, ता. धुळे) असे त्याचे नाव आहे. कदम यांनी ११ नोव्हेंबरला सकाळी दहापासून त्यांच्या शेतात कपाशीवर औषधाची फवारणी केली. दिवसभर फवारणी केल्यानंतर त्यांनी रात्री शेतातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला घरी परतल्यानंतर त्यांना मळमळ व चक्कर येऊ लागली. कुटुंबीयांनी त्यांना धुळ्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
---
कारच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार
शिरपूर ः भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पनाखेडे (ता. शिरपूर) शिवारातील धारबर्डी फाट्यावळ घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात १२ नोव्हेंबरला सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास घडला. संतोष किसन डंबाळे (वय ४१, रा. सोलवन, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते दुचाकीने सांगवीकडून पळासनेकडे जात होते. यादरम्यान अज्ञात कार (एमएच ४३, एल ५००९) चालकाने भरधाव जात संतोष डंबाळे यांना समोरून धडक दिली. या अपघातात डंबाळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामेश्वर डंबाळे यांच्या फिर्यादीनुसार कारचालकाविरुद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार कोळी तपास करीत आहेत.