वाखारी (जि. नाशिक) : देवळा तालुक्यातील वाखारी परिसरातील भिलवाड, कापशी, भावडे, मकरंदवाडी येथे गेल्या सात- आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांची अक्षरश: वाट लावली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Loss of tomato maize bajra crop in Wakhari area due to continuous rain nashik Latest Marathi News)
मॉन्सूनच्या सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी मोठ्या उत्साहात केली. शेतीसाठी लागणारी अवजारे, महागडी खते, बी- बियाणे, मजूर यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. शेतकऱ्यांनी मका, बाजरी, टोमॅटो, कांदा तसेच भाजीपाला अशी विविध पिके घेतली आहेत.
परंतु, थांबण्याचे नाव न घेणाऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी शेती पाण्याने उपळून निघाली आहे. शेतातील पिके पिवळी पडून सडू लागली आहेत. टोमॅटो पिकाचा अतिपावसामुळे चिखल झाला आहे. भाव नसल्याने खरीपावर केलेला खर्चदेखील वसूल होणार नाही, असे चित्र आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी करावा लागणारा खर्च कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ साधणे शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे. काही ठिकाणी कांद्याची रोपे खराब होऊ लागली आहेत. वाखारी व परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
संकटाची मालिका अशीच सुरू राहिली तर शेतकरी वर्गाला कर्जबाजारी होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत नाही. परिसरातील प्रमुख व्यवसाय शेती असल्याने बऱ्याच अंशी छोटे- मोठे व्यवसायिक, व्यापारी वर्ग शेतकरी वर्गावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले तर छोट्या- मोठ्या व्यावसायिकांनाही त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
"संबंधित विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच, कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये भाव मिळावा. तरच आर्थिक संकटातून सावरता येणे शक्य आहे." - मंगेश अहिरे, उपसरपंच, वाखारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.