-----------
३६-२
‘महालॅब’च्या बंद सेवा
त्वरित सुरू कराव्यात
खासदार वाजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ ः महालॅबमार्फत राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत प्रयोगशाळा तपासणी आणि रक्तनमुना संकलन सेवा तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील आरोग्य सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सेवा पुरवठादार संस्थेची शासनाकडील देयके मागील काही वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी या सेवा विस्कळीत झाल्या असून त्याचा सर्वाधिक फटका गरीब, सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना बसत आहे. विशेषतः नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक असून डायलिसिससारख्या जीवनावश्यक उपचारात खंड पडल्यास रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शासन आणि सेवा पुरवठादार संस्थेतील आर्थिक वादाचा फटका रुग्णांना बसू नये, अशी भूमिका वाजे यांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि डायलिसिस केंद्रांमधील महालॅबच्या सेवा तातडीने सुरू कराव्यात, संबंधित संस्थेची प्रलंबित देयके नियमानुसार अदा करावीत, बंद असलेले आपला दवाखाना केंद्र सुरू करावेत आणि डायलिसिस रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
---------
कोट--------
आर्थिक व्यवहारांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यसेवेवर परिणाम होणे योग्य नाही. डायलिसिससारख्या उपचारात खंड पडणे गंभीर असून गरीब रुग्णांना मोफत व दर्जेदार सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या सेवा विनाविलंब सुरू कराव्यात.
- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक.
----------------------