वखार महामंडळातून धान्याचा अपहार
----
अनियमिततेसह सव्वाकोटीच्या गहू, तांदळाचा अपहार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ ः अवधान (ता. धुळे) एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गुदामातून एक कोटी १४ लाख ९३ हजार ११९ रुपयांच्या गहू आणि तांदळाचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. धान्याची प्रत्यक्ष पाठवणी न करता कागदोपत्री वितरण दाखविल्याप्रकरणी भांडार अधीक्षक नीरज अशोक पाटील याच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत भारतीय खाद्य निगमच्या मनमाड कार्यालयातील अधिकारी गुलाबचंद आनंदराम देवांगन (रा. मनमाड) यांनी फिर्याद दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या विमोचन आदेशानुसार, गुदामात एक हजार ९६६.४ क्विंटल गहू (किंमत ६१ लाख ८५ हजार १७३) आणि एक हजार २०८.७ क्विंटल तांदूळ (किंमत ५३ लाख सात हजार ९४५), असा एकूण तीन हजार १७५.१ क्विंटल धान्यसाठा होता. भारतीय खाद्य निगमने नियुक्त केलेल्या समितीच्या चौकशीत संशयित पाटील याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी धान्याची प्रत्यक्ष पाठवणी न करता नोंदींमध्ये वितरण दाखवून अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे.