टुडे एक मेन फिचर
लोगो : दुष्काळाच्या झळा
---------
(विहिरीचे पाणी खोल गेले असे असे एआय छायाचित्र वापरावे.)
--------
शीर्षक
जिल्ह्यात भूजलपातळीत दीड ते दोन मीटरने घट
१५ तालुक्यांत स्थिती चिंताजनक; पावसाच्या २४ टक्के तुटीचा जलपुनर्भरणावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून, पिके करपल्याने उत्पादनात ६० ते ७० टक्के घट झाली आहे. त्यातच ऑक्टोबर हिटमुळे तापमान वाढल्याने विहिरींची भूजलपातळीही झपाट्याने घटत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात सरासरी दीड ते दोन मीटरने भूजलपातळीत घट झाली आहे.
भूजलपातळीत लक्षणीय घट झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान अपेक्षित पावसाच्या तुलनेत यंदा २४ टक्के तूट राहिल्याने जलपुनर्भरणावर परिणाम झाला आहे. परिणामी, विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, पावसाळा संपण्यापूर्वीच अनेक भागांत भूजलपातळी चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे.
बोदवडला सर्वाधिक घट
भूजल सर्वेक्षण विभागाने मागील पाच वर्षांतील सप्टेंबर महिन्याच्या सरासरी भूजलपातळीशी यंदाच्या सप्टेंबरअखेरच्या स्थितीची तुलना केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांत भूजलपातळीत घट झाली आहे. विभागाने १६६ विहिरींचे निरीक्षण करून हा अहवाल तयार केला. सर्वाधिक घट बोदवड तालुक्यात २.९१ मीटरने झाली असून, विहिरी व कूपनलिकांवर अवलंबून असलेल्या गावांतील पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
पावसाचा दीर्घ खंड
सामान्यतः पावसाळ्यात पर्जन्यजल जमिनीत मुरल्याने विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ अपेक्षित असते. मात्र, यंदा पावसाचे असमान वितरण आणि दीर्घ खंडामुळे भूजल पुनर्भरण अपेक्षित प्रमाणात झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यातच भूजलपातळी खालावली आहे. याचा सर्वाधिक फटका भूजलावर अवलंबून असलेल्या बागायती पट्ट्यांना बसण्याची शक्यता आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव व भडगाव तालुक्यांतील केळी, लिंबू व अन्य फळपिकांसाठी नियमित सिंचन आवश्यक असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत.
पाणीउपसा वाढणार
सप्टेंबरअखेरच भूजलपातळीत झालेल्या मोठ्या घटीमुळे पुढील आठ महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यानंतर नैसर्गिक पुनर्भरण कमी होतानाच शेतीसाठी पाण्याचा उपसा वाढणार आहे. गिरणा व तापी नदीत आवर्तने सोडूनही नदीकाठच्या भूजलपातळीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. बेसुमार वाळू उपशामुळे पाण्याचे जमिनीत झिरपणे कमी झाल्याने भूजल पुनर्भरणावर परिणाम झाला आहे.
स्थिती गंभीर होण्याची चिन्हे
जिल्ह्यातील लहान-मोठ्या तलावांमधील पाणीसाठाही कमी होत आहे. परतीचा पाऊस न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. भूजलपातळी घटत असतानाही शेतीसाठी पाण्याची गरज कायम असल्याने विहिरी व कूपनलिकांमधून अधिक खोलवर पाणी उपसावे लागत आहे. अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचनातही अडचणी येत आहेत.
------
तालुकानिहाय भूजलपातळीत झालेली घट
तालुका............विहिरींची खोल गेलेली पातळी (मीटरमध्ये)
जळगाव..............१.६३
भुसावळ.............१.०६
बोदवड..............२.९१
मुक्ताईनगर..........१.८८
यावल..............१.८६
जामनेर.............१.८१
चोपडा..............१.३५
चाळीसगाव.........१.२८
भडगाव.............१.२४
एरंडोल............१.१७
अमळनेर...........१.१२
पारोळा.............१.०८
धरणगाव...........०.९९
पाचोरा.............०.८५
रावेर................०.७८
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.