‘गट-क’च्या पदांसाठीच्या अर्हतेने वाढविली व्याप्ती
उमेदवारांना ‘प्रोफाइल’ अपडेट करण्याचे आयोगाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील विविध पदांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत आयोगाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. या परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण १६ हजार ७१७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. नव्याने समाविष्ट केलेल्या संवर्गांनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अर्जात आणि प्रोफाइलमध्ये आवश्यक सुधारणा करून संवर्गाचा विकल्प सादर करण्याची संधी आयोगाने उपलब्ध केली आहे.
यापूर्वी आयोगाने ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकामध्ये काही संवर्गांचा नव्याने समावेश केला होता. त्या अनुषंगाने नुकतेच आणखी एक शुद्धीपत्रक काढताना, त्याद्वारे ‘शिल्प निदेशक/व्यवसाय निदेशक’ आणि ‘स्थापत्य अभियांत्रिकी सहायक’ या पदांच्या नेमक्या आणि समतुल्य शैक्षणिक अर्हतेचा सविस्तर तपशील जाहीर केला आहे.
नव्याने समाविष्ट संवर्गांसाठी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरत असलेल्या, परंतु आधीच परीक्षा अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना माहिती अद्ययावत करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीतील आपल्या प्रोफाइलमधील शैक्षणिक अर्हता अद्ययावत करावी आणि प्रोफाइल पुन्हा लॉक करावे. त्यानंतर माय अकाउंटअंतर्गत संबंधित जाहिरातीसमोरील ‘व्ह्यू’ बटणावर क्लिक करून क्वालिफिकेशन अपडेट बटणाद्वारे माहिती अद्ययावत करावी. यानंतर पुढील प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करताना अर्ज दाखल करायचा आहे.
नव्याने संवर्गाचा विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच, यापूर्वी सादर केलेला मूळ अर्ज रद्द करण्याचीही गरज नसल्याचे आयोगातर्फे स्पष्ट केले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून १६ हजार ७१७ पदांवर भरती केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.