चरणमाळ आश्रमशाळेतील
विद्यार्थ्यांचे तात्पुरते स्थलांतर
इमारतीची दयनीय अवस्था; सुरक्षिततेसाठी कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
वार्सा, ता. २७ : साक्री तालुक्यातील चरणमाळ येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेच्या इमारतीची दयनीय अवस्था लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या शाळेचे तात्पुरते स्थलांतर वार्सा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या उपलब्ध इमारतीत करण्याचा निर्णय धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने घेतला आहे. याबाबत प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
चरणमाळ येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा गेल्या सुमारे २० वर्षांपासून भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. या इमारतीच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि सह्याद्री युवा शक्ती संघटनेचे ॲड. स्वप्निल कार्जिनाथ कुंवर यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी अहवालातही शाळेतील भौतिक सुविधांच्या अभावाचे चित्र समोर आले. इमारतीच्या वर्गखोल्यांच्या खिडक्या तुटलेल्या असून, भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. विद्यार्थ्यांना निवासासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. छतावरील पत्रे गळत असल्याने पावसाळ्यात अडचणी निर्माण होतात. तसेच, शौचालये, स्नानगृहे आणि इतर मूलभूत सुविधांची स्थितीही समाधानकारक नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शैक्षणिक वातावरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. प्रस्तावित स्थलांतराची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या निवासाची व शैक्षणिक सुविधांची योग्य व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.