भूमी अभिलेख कार्यालयाकडून
४८८ गटांची मोजणी, १०७८ अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता. ४ : शेतातील गट व हद्द निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मालेगाव भूमी अभिलेख कार्यालयाकडे एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत १ हजार ७८ मोजणी अर्ज दाखल झाले. त्यापैकी ४८८ गटांची मोजणी पूर्ण झाली असून ५९० गटांची प्रक्रिया सुरू आहे. भूमापन कार्यालयात १६६ मोजणी अर्जांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर १५६ अर्जांमध्ये भूकरमापकांकडून हद्द दाखविण्याचे काम सुरू आहे.
दोन हेक्टरपर्यंतच्या मोजणीसाठी २ हजार रुपये, तर द्रुतगती मोजणीसाठी ८ हजार रुपये शुल्क आकारले जाते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. त्यात मोजणीची तारीख, मोजणी सर्व्हरचे नाव व कालावधी दिलेला असतो. मुख्यमंत्री बळीराजा शेतपांदण रस्ता योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांसाठी गट मोजणी सुरू आहे. वाटणीपत्र, भाऊहिस्सा, खरेदी-विक्री, रस्ते तसेच वहिवाटीचे रस्ते निश्चित करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर मोजणी अर्ज दाखल होत आहेत. गटाची हद्द, चतुःसीमा आणि नकाशावरून रस्ता अधोरेखित करण्याचे कामही सुरू आहे.
दरम्यान, मोजणीच्या वेळी दोन गटांतील बांध, हद्द व रस्त्यावरून वाद निर्माण होतात. त्यामुळे काही मोजणी अर्जांना विलंब होत असल्याची माहिती मालेगाव भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अल्पेश पाटील यांनी दिली.