मंदी-महागाईमुळे यंत्रमागाचा खडखडाट बंद
वीज, सुताचे वाढते दर अन् मंदीचा फटका; यंत्रमाग उद्योग आठवडाभर बंद
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ६ : विजेचे दर व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, उत्पादन खर्चात झालेली वाढ, तसेच मंदीमुळे बाजारात तयार मालाची घटलेली मागणी पाहता येथील यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आला आहे. आर्थिक दळणवळण मंदावल्याने अनेक कारखानदारांकडे कामगारांना पगारासाठी देखील पैसे उपलब्ध नाहीत. यंत्रमाग उद्योगाला संजीवनी देण्यासाठी ठोस धोरण आखावे. या उद्योगाला सवलती द्याव्यात आदी मागण्या व्यावसायिकांच्या आहेत. मंदी व महागाईमुळे, तसेच केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील यंत्रमाग मंगळवार (ता. ६)पासून आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहेत. लाखो यंत्रमागांचा खडखडाट बंद झाल्याने याचा मोठा परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
येथील यंत्रमाग उद्योग गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत आहेत. यंत्रमागधारकांच्या विविध संघटना एकाच छताखाली येऊन मालेगाव पॉवर लूम उद्योग विकास समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यमातून विविध बैठका होऊन आठवडाभर यंत्रमाग व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात यंत्रमागावरील प्रक्रियाउद्योग नाहीत. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून पाली, बालोत्रा आदी भागातील प्रक्रियाउद्योग बंद होत आहेत. परिणामी, उत्पादन खर्च वाढला आहे. मीटरमागे एक ते दीड रुपयांचे नुकसान होत असल्याचे यंत्रमागधारकांचे म्हणणे आहे. येथे तीन लाखांवर यंत्रमाग आहेत. यावर लाखो कामगार काम करतात. यंत्रमागधारकांच्या सर्व बारा संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
विजेचे व सुताचे वाढलेले दर वाढले आहेत. उत्पादीत कापडाला कमी भाव मिळत असल्याने उद्योजक अडचणीत आहेत. शहरात यंत्रमाग उद्योगाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. विद्यमान परिस्थितीत यंत्रमाग चालविणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यंत्रमागाचा खडखडाट बंद झाल्याने याचा परिणाम व्यवसायावर अवलंबून असलेल्या इतर घटकांवरही होणार आहे.
---
कोट
मालेगावातील यंत्रमाग व्यवसाय आर्थिक अडचणीत आहे. केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंत्रमाग बंद करण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांना साकडे घातले जाणार आहे. शासनाने उद्योगाला सवलती दिल्या तरच दिलासा मिळू शकेल.
- साजिद अन्सारी,
अध्यक्ष, मालेगाव पॉवर लूम उद्योग विकास समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.