दिवाळी अंकासाठी लेख
----
NSK26H31808
अमळनेर : शहरालगत स्थित मंगळग्रह देवता मंदिर.
-----
NSK26H31809
मंदिरातील श्री मंगळग्रह देवतेची विलोभनीय मूर्ती.
-----
NSK26H31810 (उमेश काटे)
---------
मंगळग्रह मंदिर : देवदर्शनापलिकडे सेवाकार्याचा आदर्श
धर्म म्हणजे केवळ देवदर्शन नव्हे; धर्म म्हणजे माणसाला माणसाशी जोडणारी भावना, सेवाभाव जागवणारी प्रेरणा आणि समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाणारी शक्ती. देवस्थान म्हटले की भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म डोळ्यांसमोर येते. मात्र एखादे मंदिर स्वच्छता, शिस्त, समानता, पारदर्शकता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन यांचा आदर्श निर्माण करते, तेव्हा त्या मंदिराचे स्वरूप केवळ देवस्थानाचे राहत नाही, तर ते एक सेवाधाम बनते.
- उमेश प्र. काटे, अमळनेर
-----
मंगळग्रह देवता मंदिर. जळगावपासून अवघ्या ५०-५५ किलोमीटर अंतरावरील अमळनेर शहराचीच नव्हे; तर हे मंदिर खानदेशाची वेगळी ओळख बनले आहे. मंदिराचे व्यवस्थापन मंगळ ग्रह सेवा संस्था करते. ‘सामाजिक जाणिवेचे उचित भान असलेली संस्था’ अशी या संस्थेची सर्वमान्य व सिद्ध ख्याती आहे. त्याची प्रचिती प्रत्येकाने अनुभवली आहे. अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर हे आगळ्यावेगळ्या आणि अनुकरणीय कार्यपद्धतीमुळे अन्य देवस्थानांच्या तुलनेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे मंदिर म्हणून भाविकांच्या मनात कमालीचे श्रद्धा स्थान मिळवून आहे.
श्री मंगळ ग्रह मंदिरातील दर्शन व्यवस्थेची सर्वांत ठळक वैशिष्ट्ये म्हणजे समानता आणि शिस्त. येथे सर्वसामान्य भाविक असो अथवा प्रतिष्ठित व्यक्ती- दर्शनासाठी रांगेचे पालन करावेच लागते. मंदिर परिसरातील एक फलक या व्यवस्थेचे सार अत्यंत प्रभावी शब्दांत सांगतो -
‘सर्वांनी रांगेत दर्शन घ्यावे. वशिल्याने आपण मूर्तीपर्यंत पोहोचू शकाल; देवापर्यंत नाही!’ या एका वाक्यात मंदिराची संपूर्ण दर्शनव्यवस्था सामावलेली आहे.
मंदिराची त्रिसूत्री : स्वच्छता, नम्रता आणि पारदर्शकता
श्री मंगळ ग्रह मंदिराची कार्यसंस्कृती तीन शब्दांत सांगायची झाली तर ती म्हणजे- स्वच्छता, नम्रता आणि पारदर्शकता. विशेष म्हणजे मंदिरात विश्वस्तांचे नाव किंवा पद दर्शविणारे कोणतेही फलक लावून पदाचे प्रदर्शन केले जात नाही. मंदिरात साफसफाई करणारा सेवेकरी, चप्पल स्टँडवर सेवा देणारा सेवेकरी आणि इतर सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांच्या गळ्यात जसा सेवेकरी म्हणून ओळख दर्शविणारा बॅच असतो, तसाच बॅच संस्थेच्या अध्यक्षांपासून विश्वस्तांपर्यंत सर्वांच्या गळ्यात असतो.
अन्नछत्र : प्रसादालयात शुद्धता, पावित्र्य
मंदिरातील प्रसादालय हेही भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे. अत्यंत हायजेनिक रित्या बनणारा महाप्रसादात शुद्ध गावरान तुपातील वरण-बट्टी, गावरान तुपातील गुळाची जिलेबी, मटकीची उसळ आणि बासमती जिरा राईस असा प्रसादाचा मेनू भाविकांना पोटभर दिला जातो. गावरान तुपाचीही मुबलक उपलब्धता असते.
देवदर्शनाबरोबर समाजदर्शनही!
श्री मंगळ ग्रह मंदिराचे वैशिष्ट्य केवळ मंदिराच्या चार भिंतींपुरते मर्यादित नाही. मंदिराच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रप्रेम, वृक्षसंवर्धन, नशाबंदी, कौटुंबिक हिंसाचारापासून परावृत्ती, हुंडाबंदी आणि आदर्श विवाह पद्धती याबाबतही जनजागृती केली जाते. भाविकांना वृक्षसंवर्धन व संरक्षणाची शपथ दिली जाते. गरजेनुसार समुपदेशन केले जाते. त्यामुळे देवदर्शनासाठी आलेला भाविक केवळ धार्मिक अनुभव घेऊन परतत नाही, तर एक सामाजिक संदेश घेऊन घरी जातो.
शिक्षण, आरोग्य क्षेत्रात योगदान
गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. विशेष म्हणजे, मंदिरातील सेवेकऱ्यांच्या मुलांना केजीपासून पीजीपर्यंत शैक्षणिक साहित्य आणि फीची मदत केली जाते. आरोग्य क्षेत्रातही मंदिराचे कार्य उल्लेखनीय आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केले जाते. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया, चष्मे आदी मोफत दिले जातात.
पुरस्कार रुपी कार्याची पावती
श्री मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, पर्यटन मंत्रालयाचा पर्यटन मित्र पुरस्कार, पोस्ट विभागाकडून जारी करण्यात आलेले स्पेशल कव्हर, तसेच पाणी फाउंडेशनचा पुरस्कार अशा विविध सन्मानांनी संस्थेला गौरविण्यात आले आहे. मंदिराला विविध क्षेत्रांतील चार आयएसओ मानांकने प्राप्त आहेत. मंदिरात होणारे अभिषेक आणि मंदिराच्या माध्यमातून लावण्यात येणाऱ्या स्टिकर्सच्या उपक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
म्हणूनच श्री मंगळ ग्रह मंदिर हे केवळ दर्शनाचे ठिकाण नाही; ते सेवा, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाची एक जिवंत प्रयोगशाळा आहे.
देवळात देव असतोच; पण ज्या मंदिरात माणुसकीची सेवा, समानतेचा विचार, स्वच्छतेची संस्कृती आणि समाजहिताची भावना जपली जाते, ते मंदिर खऱ्या अर्थाने देवालयातून सेवालयाकडे प्रवास करते. त्यामुळेच हे मंदिर हे सर्वांसाठीच प्रेरणादायी उदाहरण ठरते.
----------
मंदिरापर्यंत कसे जावे...
- जळगावपासून ५० किलोमीटर अंतरावरील अमळनेर येथे जाण्यासाठी दिवसभरात अनेक बस आहेत. बसने धरणगावमार्गे अमळनेरला जाता येते..
- धुळे शहरापासून अमळनेरचे अंतर ३५ किलोमीटर. धुळ्याहून दिवसभरात अनेक बस आहेत. अमळनेर बसस्थानकावर उतरल्यावर अवघ्या ३ कि.मी. अंतरावर मंदिर आहे.
- भुसावळ- जळगाव- सुरत रेल्वे मार्गावर अमळनेर रेल्वे स्थानक आहे. स्थानकावर उतरल्यानंतर तेथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी ऑटो उपलब्ध असतात.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.