मनमाड इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाची निविदा
-----------------------------------
मध्यप्रदेशातील सेंधवा ते धामनोद दरम्यान बांधकाम
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर,ता.३ : मनमाड–इंदूर नवीन रेल्वेमार्गाबाबत मध्य रेल्वेने वणिहार (सेंधवा) ते ग्यासपूर खेडी (धामनोद) या दरम्यान ७५.५ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम निविदा प्रसिद्ध केली आहे.
संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी सांगितले की, या रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी अंदाजे २,५४८.३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात रेल्वेमार्गाचे बांधकाम, बोगदे, मोठे पूल, रेल्वे रुळ टाकणे, आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि विद्युतीकरण यांसह आवश्यक कामांचा समावेश आहे. निविदा दस्तऐवजानुसार संपूर्ण बांधकामासाठी चार वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वे सुविधांच्या विस्ताराच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ही निविदा ३० ऑक्टोबर २०२६ प्रसिद्ध करण्यात आली. पहिली प्री-बिड बैठक ३१ डिसेंबर २०२६ रोजी होणार असून, निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १८ मार्च २०२७ आहे. तांत्रिक निविदा १९ मार्च २०२७ रोजी उघडण्यात येणार आहेत.रेल्वे प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि खर्चात अनावश्यक वाढ होऊ नये, यासाठी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे संपूर्ण प्रकल्पाचे तीन ते चार भाग करून स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची तसेच प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र निविदा काढून काम सुरू करण्याची मागणी केली होती.
समितीच्या सूचनेनुसार प्रकल्पाचे सुमारे ७५-७५ किलोमीटरच्या स्वतंत्र रेल्वे खंडांमध्ये विभाजन करून डीपीआर तयार करणे आणि निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या दिशेने काम करण्यात आले आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने तयार केलेल्या भूभौतिकीय सर्वेक्षण अहवालाचा संदर्भ दिला.या अहवालानुसार धुळे, सेंधवा, अबू घाटी आणि सिहोड (बोगदा क्रमांक ९ जवळ) या भागांमध्ये २९ ग्राउंड सर्वेक्षण करण्यात आले आहेत. बहुतेक बोगदे उथळ भूस्तरातून आणि बेसाल्ट खडकांमधून जात असल्याने काही बाबतींत तुलनेने कमी धोका असल्याचे अहवालात नमूद आहे. तथापि, पाण्याची गळती होऊ शकणाऱ्या कमकुवत खडकांच्या भागांमध्ये विशेष तांत्रिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. असेही समितीने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.