धार्मिक पर्यटन
---
NSK26H32128
यावल : सातपुड्याच्या कुशीत स्थित निसर्गरम्य परिसरात खानदेशचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनुदेवी मंदिरातील देवीची मूर्ती. (संग्रहित छायाचित्र)
----
NSK26H32129
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून वाहत येणाऱ्या पाण्याचा आकर्षक धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो. (संग्रहित छायाचित्र)
-----
NSK26H32130 (जीवन चौधरी)
-----
श्रद्धास्थान आणि पर्यटनस्थळ
-----------------------
खानदेशचे कुलदैवत : मनुदेवी
बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील यावल- चोपडा रस्त्यावर असलेल्या चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुडा पर्वताच्या कुशीत सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी मातेच्या प्राचीन मंदिराची स्थापना केली आहे. हे ठिकाण जिल्ह्यातीलच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेले पर्यटन स्थळ व भाविकांचे एक श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. श्रीक्षेत्र मनुदेवी हे जळगाव धुळे नंदुरबार व संपूर्ण खानदेशवासियांचे कुलदैवतही मानले जाते.
- जीवन चौधरी, दहिगाव (ता.यावल)
बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली या गावापासून ३ किलोमीटरवर उत्तरेला आडगाव कासारखेडे गाव आहे. तेथून ४ कि.मी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी मानापुरी ही आदिवासी पाड्याची लहान वस्ती आहे. तेथूनच खऱ्या अर्थाने मनुमातेच्या पर्यटन स्थळाला व निसर्गरम्य स्थळाला सुरुवात होते. मानापुरी या लहानशा गावापासून सातपुडा पर्वताला प्रारंभ होतो. सातपुड्याच्या उंच उंच डोंगराळ भागातून कोसळणारे लहान- मोठे धबधबे, जंगलातून जाणाऱ्या हिरव्यागार वृक्षांनी नटलेले वळणदार रस्ते, त्यावर ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, नदीनाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट, हिरव्यागार वृक्षाची सळसळणारी पालवी, जणुकाही सातपुडा पर्वताने हिरवा शानू परिधान केल्याचाच भास होतो.
मंदिराविषयी आख्यायिका
प्राचीन काळी ईश्वरसेन नावाचा राजा वास्तव्य करत असताना त्या राजाकडे हजारो गाई होत्या. त्या वेळी तो राजा आपल्या हजारो गायींना पाणी पिण्यासाठी तापी नदीवर घेऊन जात असे. हजारो गायी असल्याने पहिली गाय तापी नदीवर पोहोचायची तर शेवटची गाय राजा वास्तव्य करीत असलेल्या राजवाड्यातून निघत असे. राजाने त्या वेळी आपल्या गाईंसाठी गायवाडा बांधलेला होता. आज त्या ठिकाणी गायवाड्याच्या भिंतीच्या बांधकामाचे अवशेष आढळून येतात. त्याच वेळी मंदिराची स्थापना झाली असावी असे सांगितले जाते.
मंदिरापर्यंत रस्ताच नव्हता
मनुदेवी येथे दर्शनासाठी जाताना १५-२० वर्षांपूर्वी साधा रस्ता ही नव्हता. घनदाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने त्या वेळी मंदिरावर जाता येत होते. आडगाव गावापासून कच्ची पायवाट व गाळरस्ता होता. याच रस्त्याने भाविक पायी प्रवास करून देवीचे दर्शन घेत. कालांतराने आडगाव- कासारखेडे येथील काही ग्रामस्थांनी या मंदिराची डागडुजी करून व मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायवाट तयार करून या मंदिराची दुरुस्ती केली. बरीच वर्षे भाविक डोंगराच्या कडा दऱ्याखोऱ्यातून वाट काढत देवीच्या प्राचीन मंदिरापर्यंत पोहचत. नंतरच्या काळात आडगाव व परिसरातील ग्रामस्थांनी या देवीच्या मंदिराचा विकास करण्यासाठी हातभार लावला. नंतर मनुदेवी सेवा प्रतिष्ठान या नावाने संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून व येणाऱ्या उत्पन्नातून मंदिराचा विकास करण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमधून तथा मनुदेवी विकास निधीतून रस्ताची दुरुस्ती करून चिंचोली ते मनुदेवी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. आज मंदिराच्या पायथ्याशी मोठी वाहने जाऊ शकतात.
कोठवाय नदी सातवेळा ओलांडल्यांनंतर मंदिर
मानापुरी गावापासून काही अंतरावर पुढे मारोती मंदिर आहे. आधी मारोती मंदिर ते मनुदेवी मंदिर असा प्रवास करताना कोठवाय नावाची नदी जी सातपुड्यातून उगम पावते. पावसाळ्यात तर दऱ्याखोऱ्यातून वाहत येणारे पावसाचे पाणी, तसेच नदीतून खळखळ वाहत जाणाऱ्या पाण्यातूनच मंदिरापर्यंत पोहोचता येत होते. आज तेच पाणी मारोती मंदिराजवळ बांधण्यात आलेला तलावात जमा होते. आजही ही नदी सातवेळा पार करून मंदिरात जावे लागते.
नयनरम्य धबधबा.. आकर्षणाचे केंद्र
मंदिरात प्रवेश करण्याआधी समोरच दीडशे फुटांवरून नयनरम्य असा धबधबा कोसळतो. याचा आनंद पर्यटक मनमुरादपणे लुटत आहेत. याच धबधब्याचे पाणी कोठवाय नदीला मिळून पाझर तलावात जमा होते. या तलावाच्या पाण्याचा आडगाव, कासारखेडा, नायगाव, चिंचोली आदी गावांना लाभ मिळतो.
भाविक, पर्यटकांसाठी पर्वणी
श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर परिसरात दरवर्षी नवरात्रोत्सवात नऊ दिवस मोठे यात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात नऊ दिवस हजारो भाविक मंदिरात देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. चैत्र महिन्यात व पिठोरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते. जुलै- ऑगस्ट पावसाळ्यात व श्रावण महिन्यात सातपुडा पर्वताने जणूकाही हिरवा शालू नेसल्याची अनुभूती येते. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर भाविक व पर्यटकांना खुणावतो.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.