मेन फिचर
NSK26H32860
जळगाव : स्वच्छतेचा कामांच्या पाहणीदरम्यान नागरिकांकडून माहिती घेताना महापौर दीपमाला काळे.
..........
अस्वच्छतेवरून महापौरांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
प्रभाग दोनमध्ये पाहणी; अतिक्रमण हटविणे, कर्मचाऱ्यांच्या हजेरीची तपासणीचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१७ : शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेत महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाहणी केली. या वेळी अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या, रस्त्यांच्या कडेला गवत वाढलेले, तर काही ठिकाणी अतिक्रमणामुळे अस्वच्छता निर्माण झाल्याचे दिसून आले. नागरिकांच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहून महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत सुरू असलेल्या या पाहणीदरम्यान लहान गल्ल्यांमधील अस्वच्छतेचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला. प्रभागात स्वच्छतेसाठी ३५ कर्मचारी कार्यरत असून, मोठ्या कामांसाठी दोन जेसीबी उपलब्ध आहेत. तरीही स्वच्छतेबाबत अपेक्षित सुधारणा दिसत नसल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छता निरीक्षक निकम यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांना कामाचे नियोजन सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या. या पाहणीवेळी नगरसेवक विजय बांदल, सागर सोनवणे, पूजा जगताप, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले आणि विद्युत विभागाचे सुमित पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविणार
जोगी नगर परिसरात गटारींवर अतिक्रमण झाल्याचे पाहणीत आढळले. संबंधित अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. बांधकामानंतरचे साहित्य रस्त्यांवर टाकल्याने वाहतुकीसह स्वच्छतेलाही अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांना नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पुलाखालील अतिक्रमण आणि अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
चौकट
कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी हजेरी रजिस्टर तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. दररोजच्या कामाचे योग्य नियोजन करून प्रभागातील स्वच्छता नियमित राखावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.