दुचाकी मागण्याच्या वादातून
तरुणावर प्राणघातक हल्ला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : मोटारसायकल मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील तुरखेडे गावात रवींद्र रामचंद्र शिरसाट (वय ३७, व्यवसाय- शेती, रा. तुरखेडे, जि. जळगाव) कुटुबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांचा लहान भाऊ ज्ञानेश्वर याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांनी तालुका पोलिसांत दिली आहे. त्यात नमूद केल्याप्रमाणे, घटनेच्या दिवशी (८ नोव्हेंबर) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान विदगाव-जळगाव रस्त्यावर धामणगाव फाट्यावर ज्ञानेश्वर रामचंद्र शिरसाट (वय ३५) आणि संशयित जितेंद्र नवल सोनवणे (रा. भोकर, ता. जि. जळगाव) यांच्यामध्ये मोटारसायकल मागण्याच्या कारणावरून भांडण झाले. भांडणाचा राग अनावर होऊन संशयित जितेंद्र सोनवणे याने ज्ञानेश्वर याला जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यात व कानावर जोरदार वार केले. यात तो गंभीर दुखापत होऊन जखमी झाला असून, संशयिताने त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
हल्ल्यानंतर संशयित जितेंद्र सोनवणे हा फरार झाला असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक नयन पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.