टुडे एक ॲंकर
NSK26H31686
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वृक्षलागवड प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर.
नाना पाटेकरांनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या वेदना
विद्यापीठात लावले आठवणींचे रोपटे; परिसरातील निसर्गसौंदर्याचे केले कौतुक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी खानदेश हादरलेला असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिलेली भेट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. २५ ऑक्टोबर २०१५ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या मदतवाटप कार्यक्रमात खानदेशातील आत्महत्याग्रस्त ३५३ शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्यात आली होती.
शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या. शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावरची संवेदना आणि आपुलकी अनेकांना भावली. मदत ही केवळ आर्थिक स्वरूपाची नसून संकटाच्या काळात समाजाने या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमानंतर नाना पाटेकर यांनी विद्यापीठ परिसराची पाहणी केली. हिरवाईने नटलेल्या परिसराचे आणि येथील निसर्गसौंदर्याचे त्यांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांनी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपणही केले.
चौकट
त्या आठवणी आजही देतात भेटीची साक्ष
शेतकरी आणि पर्यावरण हे एकमेकांशी घट्ट जोडलेले विषय असल्याने त्यांच्या या कृतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या या भेटीमुळे विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच शेतकरी कुटुंबीयांमध्येही वेगळा उत्साह निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या दुःखाशी समरस होत त्यांची व्यथा ऐकणारे नाना पाटेकर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यापीठ परिसरात लावलेले रोप, या दोन्ही आठवणी आजही त्या भेटीची साक्ष देतात.