ॲंकरसाठी......
बातमीत नाना पाटेकरांचे छायाचित्र वापरावे.....
माणूस म्हणून मनात घर करणारा कलावंत नाना
मंत्री संजय सावकारे ः भुसावळकरांनी नाना पाटेकरांविषयी व्यक्त केल्या भावना
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ८ : कलाकार अनेक येतात आणि जातात पण कलाकाराच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून मनात घर करणारे नाना पाटेकर मला अधिक भावले. असे पुन्हा नाना पाटेकर होणे नाही, अशी भावना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. भुसावळकरांनी देखील नाना पाटेकर यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंत्री सावकारे म्हणाले, एक रंगभूमीवर तयार झालेला कलाकार नंतर चित्रपटसृष्टीत दाखल झाला व तेथे आपली वेगळी छाप तयार केली. आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपटात अविस्मरणीय भूमिका निभावल्या. काही चित्रपटातील त्यांचे संवाद तर कधीच विसरता येणार नाही. जिवंत अभिनयासोबतच त्यांच्या आवाजाचे भारीपण एक वेगळी छाप निर्माण करायचे. आमच्या पिढीला नाना कायम स्मृतीत राहतील. सामाजिक जाण आणि संवेदनशील मन असलेले नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी व अष्टपैलू कलाकार गमावला. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागासाठी केलेले त्यांचे सदैव स्मरणात राहील. असे सावकारे म्हणाले.
चालते बोलते विद्यापीठ
विरेंद्र पाटील (अध्यक्ष ः स्नेहयात्री प्रतिष्ठान, भुसावळ) ः नाना म्हणजे भारतीय सिनेमातला स्वतंत्र एक अध्याय होते. ते अभिनयाचं एक चालते बोलते विद्यापीठ होते. सिनेसृष्टीतला स्टार असलेला हा माणूस आमच्यासाठी मात्र शेवटपर्यंत ‘नाटकवालाच’ होता. कदाचित याच एका अदृश्य नात्याने आम्ही नानांशी जोडले गेलो होतो. नाना गेले तरी आमच्या प्रत्येक कलाकृतीतून, कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून, ते पुन्हा पुन्हा रंगभूमीवर येत राहीलच. तो असेल आमच्या श्वासात चिरकाल कधी त्याच्या असंख्य अजरामर भूमिकांच्या रूपाने, कधी त्याच्या धीरगंभीर आवाजाच्या रूपाने, तर कधी आमच्या कलाकृतीतून उमटणाऱ्या एखाद्या भावनेच्या रूपाने.
जमिनीशी नाते असलेला अभिनेता
वैष्णवी अग्निहोत्री (तपस्या डान्स अकादमी, ठाणे. मूळ रा. भुसावळ) ः नानांची अभिनयाची समज, निरीक्षणशक्ती व प्रत्येक भूमिकेत स्वतःला झोकून देण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. लोकप्रिय असूनही त्यांची माणसांशी असलेली ओढ व साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत सुंदर गुण होता. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्त्वाने ते जगले. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्यांनी आपला साधेपणा आणि जमिनीशी असलेले नाते कधीच सोडले नाही.
सिनेसृष्टीतील क्रांतीवीर हरपला
सुयश न्याती (अध्यक्ष ः रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी) ः नाना पाटेकर हे उत्कृष्ट रंगकर्मी व सिने अभिनेते होते. अभिनय व बोलण्याच्या विशिष्ट व प्रभावी व दिमाखदार शैलीमुळे ते जनरेशन एक्स व वाय यांच्या विशेष आवडीचे होते. बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून गाजलेले ते बहुदा एकमेव मराठी अभिनेते असतील. ‘ॲंग्री कॉमन मॅन’ म्हणून त्यांनी जनसामान्यांच्या मनामध्ये स्थान मिळविले होते. त्यांच्या निधनाने आपण सिनेसृष्टीचा ‘क्रांतिवीर’ व ‘नटसम्राट’# गमावला.
डोळ्यांतही अभिनयाची ताकद
जयश्री पुणतांबेकर (नाट्य कलावंत, भुसावळ) ः बहुआयामी व कणखर व्यक्तिमत्व, अभिनयाचा राजा, न बोलता सुद्धा फक्त नजरेने म्हणजेच डोळ्यांनी आपले मत, आपला अभिनय व्यक्त करणारा नटसम्राट अचानक कोणाला काहीही न कळू देता, या जगाचा निरोप घेतो तेव्हा ही घटना मनाला चटका लावून जाते. हिंदी व मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमी यांचे अतोनात न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
सिनेसृष्टीत अढळ स्थान
संजय चांडक (व्यावसायिक ः भुसावळ) ः नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने व प्रभावी संवादफेकीने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अढळस्थान निर्माण केले आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाची वेगळीच उंची दिली. त्यांचा आवाज, अभिनयशैली आणि अजरामर व्यक्तिरेखा रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील.
भूमिका स्मरणात राहतील
भूषण वैद्य (शिक्षक ः सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, यावल) ः नाना पाटेकर चित्रपट सृष्टीला आपल्या अनुभवाच्या, दमदार अभिनयाच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर नेणारे व्यक्तिमत्व होते. मायेच्या माणसाच्या विरहाने हृदयाच्या चिरेबंदीला पडलेले तडे काळ बुजवू शकत नाही. नानांच्या स्मृती, त्यांची व्यक्तिरेखा आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठी चित्रपट सृष्टीला नटसम्राटाच्या भूमिकेतून दिलेला आकार कायम स्मरणात राहील.
----------पूर्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.