02560
नांदगाव : चोरीच्या दुचाकी व संशयित यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे समवेत पोलिस पथक.
नांदगावला चोरीच्या १२ दुचाकी जप्त
चार संशयित ताब्यात; ३ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक, नांदगाव ता. १७ : तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नांदगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरीचा संशय असलेल्या तब्बल १२ दुचाकी जप्त केल्या आहेत.या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नांदगाव ते येवला मार्गावरील भवरी फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान प्रशांत बाबासाहेब भवर, लक्ष्मण रामदास सोनवणे, बाळू किशोर मोरे आणि अक्षय किशोर मोरे या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहिती असतानाही त्यांची खरेदी-विक्री करण्याच्या व्यवहारात संबंधित संशयित सहभागी असल्याचा आरोप आहे. पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे, सहाय्यक निरीक्षक सतिष गावित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार केशव सूर्यवंशी,पोलीस शिपाई अमोल नागरे,अनिल जाधव व रमेश सानप करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी नेमक्या कोणत्या ठिकाणांहून चोरीला गेल्या आहेत. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.