फोटो : NSK26H31997
नंदुरबार : ‘स्मशान सहल’ उपक्रमात विचार मांडताना रणजित राजपूत. शेजारी समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी.
---
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नंदुरबारात ‘स्मशान सहल’
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ‘अंनिस’चा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १३ : अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने सर्वपित्री अमावास्येच्या रात्री नंदुरबारात ‘स्मशान सहल’ उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे शहरातील मुख्य स्मशानभूमीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी भूत, भुतांच्या संकल्पना, अंधश्रद्धा आणि त्यामागील मानसिक कारणांवर चर्चा केली.
भुतांची निर्मिती कशी होते, त्यांच्या अस्तित्वाबाबत समाजात प्रचलित असलेल्या समजुती आणि मनाशी संबंधित विविध आजार यांविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. भुतांच्या नावाखाली पसरविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांचे निर्मूलन कसे करता येईल, यावरही विचारमंथन करण्यात आले.
अंधश्रद्धेमुळे अनेकदा नागरिकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. भीतीचा गैरफायदा घेऊन काही जणांकडून फसवणूक व शोषण केले जाते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार आणि जनजागृती आवश्यक असल्याचे या वेळी सांगण्यात आले. चर्चेदरम्यान उपस्थितांनी अंधश्रद्धेशी संबंधित विविध अनुभव आणि किस्सेही मांडले.
समाजातील भीती आणि गैरसमज दूर करून विवेकवादी विचारांचा प्रसार करणे, हा ‘स्मशान सहल’ उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला दीपक चौधरी, संजय चौधरी, सूर्यकांत आगळे, बलदेव वसईकर, पराग जगदेव, रणजित राजपूत, दिग्विजय राजपूत, वसंत वळवी, कीर्तीवर्धन तायडे, पीयूष आगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.