( टुडे पान एक मेन लिड)
फोटो : NSK26H31376
नंदुरबार : रस्त्याच्या कामामुळे दंडपाणेश्वर उद्यानाची झालेली वृक्षतोड.
------------------------
रस्ते कामांसाठी डेरेदार वृक्षांची तोड
दंड पाणेश्वर मंदिर परिसरातील प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींकडून चिंता
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ५ : शहरातील दंडपाणेश्वर मंदिर परिसर तसेच नवापूर- धुळे बायपासनजीक रस्ते विकासाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत आहे. वर्षानुवर्ष जतन करून वाढविलेले वृक्ष एका दिवसात जमिनदोस्त होताना पाहून पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. रस्त्यांच्या विकासासाठी ही तोड केली जात असली तरी महामार्गालगत वृक्षांची पुन्हा लागवड करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासनाने ठोस नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
----------
रस्ते रुंदीकरण अथवा नवीन रस्त्यांच्या कामासाठी झाडे तोडताना पर्यावरणीय परिणामांचा विचार होतांना दिसत नाही. अनेक वर्षे वाढलेली मोठी झाडे तोडल्यानंतर त्यांच्या बदल्यात किती झाडांची लागवड केली जाणार आहे, त्यांची देखभाल कोण करणार आहे आणि ती प्रत्यक्षात जगतात की नाही, याबाबत माहिती जनतेला मिळणे अपेक्षित आहे.
पक्षांच्या अधिवासावर परिणाम
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होतेच मात्र पक्षी व विविध वन्यजीवांच्या अधिवासावरही परिणाम होत असतो. झाडांची तोड झाल्यानंतर पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत असतो. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. विकासकामे करताना पर्यावरणाची कमीतकमी हानी होईल, याची काळजी घेतली गेली पाहिजे. शक्य तितकी कमी वृक्षतोड केली जाईल, याचा विचार झाला पाहिजे. ज्या कामांसाठी वृक्षतोड करावी लागणार आहे, त्या भागात किमान दोन वर्ष आधी पर्यायी वृक्षलागवड केली गेली पाहीजे. स्थानिक प्रजातींची झाडे लावून त्यांची नियमित देखभाल झाली पाहीजे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
वृक्षतोड झाल्यानंतर वृक्षलागवड मोहिम राबविली जाते. मात्र, प्रत्यक्षात लावलेली झाडे जगली का, याचे निरीक्षण होत नाही. केवळ कागदोपत्री लागवड करून पर्यावरण रक्षणाचा देखावा केला जातो. संबंधित विभागाने लागवड केलेल्या झाडांची संख्या, ठिकाणे आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी याची माहिती सार्वजनिक केली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विकासकामे झालीच पाहीजे. मात्र, विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोलही राखला गेला पाहिजे. रस्ते विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण व्हायला हवे. तरच भविष्यातील पिढ्यांना हिरवळ पाहायला मिळेल. यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
-----------------------
(किशोरभाई वाणी : NSK26H31387)
जीव लावून वाढविलेले वृक्ष तुटतांना डोळ्यात पाणी आले
दंडपाणेश्वर उद्यान हे नंदुरबारकरांचे श्रद्धेचे ठिकाण आहे. येथील गणपतीच्या मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आणि जगविली. नवापूर, साक्री मार्गाने जाणाऱ्या वाहनातील प्रत्येक माणसाचे लक्ष ही झाडे वेधून घेत होती. १९९९ ला आम्ही या उद्यानाचे पूर्णपणे सुशोभिकरण केले. साधारण २५ वर्षांपूर्वीची ही झाडे आता रस्त्याच्या कामासाठी तोडण्यात आली आहेत. झाडांची तोड झालेली पाहून मनाला खूप वेदना होत असतात. बॉटल पामची ४०, आंब्याचे एक, अमरताशची ३ आणि फुलझाडांसह किमान १०० झाडे जमिनदोस्त झाली आहेत. संबंधित विभागाने उद्यानाच्या पश्चिमेला मातीचा भराव करून द्यावा व झाडे लावून द्यावीत, अशी मागणी आम्ही केली आहे. आमचा विकासाला विरोध नाही, पण पर्यावरणाची झालेली हानी पुन्हा भरून काढण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात, ही अपेक्षा आहे, अशी भावना दंडेपाणेश्वर गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किशोरभाई वाणी यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.