आधीचे प्रकल्प धूळखात, त्यात नव्या बीओटीचा घाट
भाजपच्याच विरोधामुळे तीन प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे, महासभा वादळी होणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : दादासाहेब फाळके स्मारक, स्व. यशवंतराव चव्हाण तारांगण केंद्र, वॉटर पार्क, बोटॅनिकल गार्डनसारखे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज बंद अवस्थेत किंवा दुरवस्थेत पडलेले असतानाच, सिंहस्थाच्या नावाखाली पुन्हा बीओटी तत्त्वावर नवे प्रकल्प लादण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नाला आता सत्ताधारी भाजपमधूनच तीव्र विरोध होऊ लागला आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आडगाव येथील सुमारे दहा एकर जागेवर रामायण थीम पार्क उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील प्रसंग आणि रामायणकालीन वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवण्याचे या प्रकल्पात नियोजित आहे. मात्र हा प्रकल्पही बीओटीवर देण्याचा घाट घातला गेला आहे. याशिवाय पंचवटीतील गणेशवाडी मार्केटमध्ये डिजिटल अनुभव केंद्र आणि नाशिकरोड येथील यशवंत मंडईचा बीओटीतून विकास करण्याचे दोन अन्य प्रस्तावही मंगळवारच्या महासभेपुढे येणार आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही बीओटी प्रस्तावांना विरोधी पक्षासह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच आक्षेप घेतला आहे. महासभेपूर्वी झालेल्या भाजपच्या अंतर्गत बैठकीत अनेक नगरसेवकांनी संतप्त सवाल केला की, महापालिका विकायची आहे का, आधीचेच चांगले प्रकल्प चालवता येत नसताना नव्याने बीओटीचे प्रस्ताव आणू नका, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या महासभेत हे तिन्ही विषय बारगळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय नगरसेवकांच्या दहा लाख रुपयांपर्यंतच्या विकासकामांच्या फायलीही रखडल्याने त्याचे पडसादही सभेत उमटणार आहेत.
--चौकट
विरोधक आक्रमक
दुसरीकडे सिद्धार्थ गोरे मृत्यू प्रकरणावरूनही महासभा चांगलीच गाजणार आहे. गंगापूर धरण थेट जलवाहिनीच्या कामातील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सिद्धार्थनगर येथे सिद्धार्थ गोरे या युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिंदाल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि उपठेकेदारांना सहआरोपी करावे, असे आदेश महापौर हिमगौरी आडके यांनी मागील महासभेत दिले होते. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मृताच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची आणि मृताची पत्नी मनिषा गोरे यांना महापालिकेत मानधन तत्त्वावर नोकरी देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र महापौरांच्या या आदेशाची अंमलबजावणीच झालेली नाही. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने विरोधक आक्रमक झाले असून मंगळवारच्या सभेत याचा जाब विचारणार असल्याचे ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बीओटीचे प्रस्ताव आणि जिंदालचा मुद्दा या दोन्ही कारणांमुळे मंगळवारची महासभा चांगलीच वादळी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.