फोटो : B05027
नाशिक : महापालिका शाळांमध्ये स्वच्छता करताना
--
महापालिका शाळांमध्ये ‘डीप क्लीन ड्राईव्ह’
‘सेवा संकल्प’ अभियानानिमित्त अभिनव उपक्रम
नाशिक, ता. २ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सुरु असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
मनपाच्या एकूण १०० प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह ही विशेष स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात आणि प्रभावीपणे पार पडली. ही मोहीम महापौर हिमगौरी आडके व मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या संकल्पनेतून, तसेच उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, अतिरिक्त आयुक्त नीलेश भदाणे आणि शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सकाळी सर्व शाळांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून स्वच्छतेचा सामूहिक संकल्प करण्यात आला. या मोहिमेचे वैशिष्ट्य़ म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामापासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आले. त्याऐवजी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मनपाचे वॉटर ग्रेस कर्मचारी आणि जागरूक पालकांनी स्वतः हातात झाडू घेऊन मैदानात उतरत श्रमदान केले. वॉटर ग्रेस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या पाण्याच्या वाहनांच्या मदतीने शाळांच्या वर्गखोल्या, व्हरांडा, कार्यालय, स्वच्छतागृहे आणि संपूर्ण शालेय परिसर पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात आला.
पर्यावरणपूरक स्वच्छता
या मोहिमेत केवळ स्वच्छताच नव्हे तर पर्यावरणाचे भानही ठेवण्यात आले. पाण्याचा अपव्यय टाळण्यात आला, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आणि गोळा झालेला सर्व कचरा थेट घंटागाडीत जमा करण्यात आला. मनपा शिक्षण विभागाने सर्व शाळांकडून स्वच्छतेपूर्वीची आणि स्वच्छतेनंतरची छायाचित्रे संकलित केली असून त्याची नोंद ठेवण्यात आली आहे. या डीप क्लीन ड्राईव्हमुळे नाशिक मनपाच्या सर्व शाळांचा परिसर चकाचक झाला असून विद्यार्थ्यांना अधिक आरोग्यदायी, स्वच्छ आणि प्रसन्न शैक्षणिक वातावरण मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.