मेन
फोटो : H34312, H34313, H34314, H34316
--
जिल्हा न्यायालयात साडेपाच तास थरार
बॉम्बने उडवून देण्याची धमकी; तपासाअंती सुटकेचा निःश्वास
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : जिल्हा व सत्र न्यायालयाची नूतन इमारत बॉम्बने उडवून देणारा धमकीचा ई- मेल सोमवारी (ता. २) सकाळी प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. या धमकीच्या ई-मेलची गंभीर दखल घेत दहशतवादीविरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस) आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली. सुमारे साडेपाच तास संपूर्ण न्यायालय परिसर अन् इमारत कसून तपासल्यानंतर काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने पोलीस व न्यायालयीन प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, नाशिकसह ठाणे, साताऱ्यासह राज्यातील ८ ते १० जिल्हा न्यायालयांनाही अशाच स्वरूपाचे धमकीचे ई-मेल आल्याचे समोर आले आहे.
‘दुपारी ३.११ वाजता स्फोट घडवून आणू
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारी सकाळी अज्ञाताकडून आलेला ई-मेल पाहताच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. या ई-मेलमध्ये ‘दुपारी ३.११ वाजता नाशिक जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून दिली जाईल’, अशी थेट धमकी देण्यात आली होती. या प्रकाराची माहिती तात्काळ प्रधान जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेचच शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधून सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले.
--
कामकाज थांबवून इमारतींचा घेतला ताबा
धमकीची माहिती मिळताच बॉम्ब शोधक- नाशक विभागाच्या प्रमुख पोलिस निरीक्षक कीर्ती पाटील या आपल्या पथकासह आणि ‘अल्फा’ व ‘लकी’ या दोन श्वानपथकांसह न्यायालयात दाखल झाल्या. परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, शहर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांच्यासह गुन्हे शाखेची विविध पथके घटनास्थळी पोहोचली. प्रधान न्यायाधीश रोकडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ व कनिष्ठ न्यायालयांतील सर्व कामकाज तातडीने थांबवण्यात आले. वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवून सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण इमारतींचा ताबा घेतला.
--
अल्फा अन् लकीने पिंजला परिसर
दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पोलिसांनी मुख्य नवीन इमारत, जुनी इमारत, सत्र न्यायालयाची दुसरी इमारत, वकिलांचे मारुती चेंबर्स आणि संपूर्ण वाहनतळ परिसर पिंजून काढला. बॉम्ब शोधक-नाशक पथकातील अल्फा व लकी या प्रशिक्षित श्वानांनी प्रत्येक न्यायदान कक्ष, मजले व संशयित वस्तूंची बारकाईने तपासणी केली. मात्र, तपासणीअंती कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
--
बॅग अन् गाड्यांची झडती
तपासणी सुरू असताना न्यायालयाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर पोलिसांनी अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती. आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात होती. वकील, पक्षकार आणि महिलांच्या बॅगांची झडती घेतली जात होती. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या डिक्की तपासूनच सर्वांना आत सोडले जात होते. या प्रकरणी पोलिस आता धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञाताचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.