Nashik Rain Crisis : पावसाळा सुरू होऊन अर्ध्याहून अधिक काळ उलटला असला तरी निम्मा नाशिक जिल्हा सद्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला, चांदवड, नांदगाव, बागलाण, मालेगाव, आणि कळवण या तालुक्यांमध्ये सध्या अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे रिमझिम पावसाच्या भरवशावर केल्या जाणाऱ्या पेरण्या वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
परिणामी दुबार पेरणीचे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सरकारकडे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. (Nashik district in trouble of drought Demand from talukas to declare drought to government news)
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला चांदवड, नांदगाव, बागलाण, मालेगाव आणि कळवण या तालुक्यांमध्ये अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे यावर्षी खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून सरकारने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
ना. विखे यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन श्री. कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली. राज्यातील अनेक भागात यंदा चांगला पाऊस पडलेला असताना नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात मात्र विषम परिस्थिती आहे.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अद्याप खरीपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील येत्या काळात भेडसावणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जेमतेम पडलेल्या पावसात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणी केल्या.
काही ठिकाणी दुबार पेरण्या झाल्या. मात्र उगवलेली पिके करपून गेली आहेत. महागड्या बियाण्यांचा व मशागतीचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडला आहे. शेतात पीक उगवले नसल्याने दारातली जनावरे जगवायची कशी असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.
राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला, चांदवड, नांदगाव, बागलाण, मालेगाव, कळवण या तालुक्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन तेथे दुष्काळ जाहीर करावा. जनावरांसाठी चारा डेपो, छावण्या, पाणी उपलब्ध करून द्यावे.
गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टँकर सुरू करावेत. शेतकऱ्यांना विज बिल माफी, कर्जमाफी द्यावी. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे. यासह दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी आमदार कोकाटे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली.
शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) डॉ. जयंत पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले आहे.
मालेगाव शहरासह तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे त्याचा सर्व घटकांवर परिणाम होत आहे. तालुक्यात शेती हेच प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे.
मागीलवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. या वर्षी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत देखील समाधानकारक पाऊस झाला नाही. जेमतेम ७० ते ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. तब्बल महिन्यापासून पाऊस बेपत्ता आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या वाया गेल्या आहेत. काही ठिकाणी शेतकरी विहीर व शेततळ्याचे पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च वाया गेला आहे.
पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील दळणवळण मंदावले आहे. बाजारपेठांवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने उपाययोजना करून मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुरपाणी शेतीला मिळावे
सध्या गिरणा नदीला पुरपाणी आले आहे. काही दिवसापासून कमी प्रमाणात का होईना नदीतून पाणी वाहत आहे. गिरणेचे पूरपाणी उजव्या व डाव्या कालव्याद्वारे शेतीला देवून पिके वाचावीत. पुरपाणी शेतीला मिळाल्यास पिकांना जीवदान मिळेल.
तसेच अनेक लहान मोठ्या पाणीपुरवठा योजनांना देखील लाभ होवू शकेल. पुरपाणी संदर्भात तत्काळ निर्णय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना कराव्यात अशी मागणीही डॉ. पवार यांनी निवेदनात केली आहे.
बागलाण तालुक्यात गेल्यादोन महिन्या पासून पाऊस झालेला नाही. जून व जुलै महिन्यात नाममात्र पावसावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात त्याची सर्व पिके करपून गेली असून शासनाने बागलाण तालुका तात्काळ दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा अशी मागणी आज बागलाण तालुका शेतकरी संघटनेने केली आहे.
बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो शेतकऱ्यांनी बागलान चे तहसीलदार दीपक चावरे तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना या आशयाचे निवेदन दिले.
निवेदनात,बागलाण बागलाण तालुक्यातील जून जुलैमध्ये पेरा केलेली बाजरी सोयाबीन तुर भुईमूग कडधान्य व तेलबिया वर्ग सर्व पिकांचे पावसाने ओढ दिल्याने आतोनात नुकसान झाले आहे. सर्वच पिके करपू लागली असून बहुतांश पेरण्या वाया गेले आहेत.
80 टक्के शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. ३० जून ते १५ जुलै दरम्यान तालुक्यातील मोसम नदीवरील हरणबारी व आरम नदीवरील केळझर ही दोन्ही धरणे सध्या ओव्हर फ्लो झाली आहेत.
दोन्ही नद्या वहाताना दिसत असल्या तरी विहिरींनी मात्र तळ गाठला सर्वच शेतकऱ्यांचा पीक पिण्यासाठी झालेला संपूर्ण खर्च वाया गेला पिक विमा कंपन्यांनी या सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर करावा व शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळातील सर्व सवलती देऊन दिलासा द्यावा असेही निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शेलेंद्र कापडणीस तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी, नयन सोनवणे, महेंद्र जाधव देविदास आहिरें, वैभव आहिरे, वसंत जाधव, उमेश खैरनार, सागर पवार, रविराज जाधव, चेतन पवार, गणेश पवार, त्र्यंबक जाधव, योगेश शेवाळे, वैभव गीते आदी शेतकरी उपस्थित होते.
पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने संभाव्य दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटकाने हे संकट आपल्या कुटूंबातील समजून त्यावर मात करण्यासाठी नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी, चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम द्या.
यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार सुहास कांदे यांनी प्रशासनास देत दुष्काळ सदृश्य परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांना चालना देतांना कृती आराखडा तयार ठेवण्याचे देखील सांगितले.
अपुऱ्या पावसामुळे तालुक्यात उद्भवू शकणारी दुष्काळसदृश परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने, आणि सर्व आकस्मिक उपाययोजना सुव्यवस्थित करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी (ता.१८) येथील शिवनेरी विश्रामगृहात आमदार कांदे यांनी प्रशासनातील विविध खातेप्रमुखासह आढावा बैठक घेतली.
बैठकीत बोलतांना श्री. कांदे म्हणाले, की पंधरवड्यात पाऊस झाला नाही तर पुढे कुठल्या उपायोजना करावयाच्या याबाबत चर्चा करत संभाव्य करतांना आमदार सुहास कांदे यांनी कोरोनाच्या संकटकाळात राबविलेल्या नियोजनाची आठवण उपस्थितीत प्रशासनाच्या विविध खातेप्रमुखांना यावेळी करून दिली. धरण पूर्ण भरेपर्यंत शेतीला पाणी वापरू नये, पिण्यासाठीच ते आरक्षित करण्यात यावे.
असे करतांना शेतकऱ्यांच्या मोटारी उचलू नये त्यांना अगोदर नोटीस दयावी नंतर कारवाई करावी, चारा छावणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावे, पीक विम्याबाबत चार दिवसात अहवाल तयार करावा.
पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून टँकरच्या फेऱ्या वाढवाव्यात पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरु असल्यामुळे प्रत्येक गावात, वाड्या, वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात हयगय करू नका.
गळती लागलेले टँकर पाठविणे किंवा वाहन नादुरुस्त झाल्यामुळे फेऱ्या कमी करणे, तसेच दोन दोन दिवस टँकर न पाठविणे असे प्रकार होवू देवू नका, अशी ताकीद आमदार सुहास कांदे यांनी दिली. या बैठकीत ५६ खेडी नळयोजना, वीज वितरण कृषी विभाग या विभागातल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
शिधापत्रिका आरोग्य शिबिरे यापातळीवर स्वखर्चाने राबविलेल्या आमदार आपल्या दारी सारख्या उपक्रमातून तळागाळातल्या हजारो लाभार्थ्या पावेतो शासकीय योजनेचे लाभ पोचल्याचे आमदार कांदे यांनी आवर्जून नमूद केले ७८ खेडी पाणी योजना सहा महिन्यात पूर्ण होईल.
त्यासोबत गिरणा धरणावरील नांदगाव शहराची योजना देखील मार्गी लागणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, कृषी अधिकारी आर जी डमाले, सहायक अभियंता ज्ञानेश्वर वाटपाडे, मुख्याधिकारी विवेक धांडे, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, आदी उपस्थितीत होते.
चांदवड तसेच येवला येथील परिस्थिती देखील सारखीच असल्याने या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची दुर्दशा झालेली दिसून येत आहे.
अनियमित पडणारा पाऊस आणि उपलब्ध पाण्यावर पीक काढणे आता शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले असून याठिकाणी देखील लोकप्रतिनिधींकडून शासनाला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.