फोटो : 31219
नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळाच्या उपाय योजनांविषयी शुक्रवारी चर्चा करताना पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह
जिल्ह्यातील पाच तालुक्यांचाही ‘दुष्काळ प्रस्ताव’
पालकमंत्री गिरीश महाजन : ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी नियोजनाचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : जिल्ह्यातील चांदवड, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी आणि नाशिक या पाच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करण्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (ता.२) दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना महाजन बोलत होते. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटले असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या पुरेसा जलसाठा असला, तरी तो ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे, असे महाजन यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चारा व पाण्याचेही नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली. येवला तालुक्यात नऊ, तर नांदगाव तालुक्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चारा लागवडीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन विकासालाही चालना
येवला तालुक्यातील ममदापूर येथील नियोजित काळवीट सफारी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी, पहिणेसह त्र्यंबकेश्वर पर्यटन सर्किट, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचा विकास, ओझरखेड धरणातील बेटावर पर्यटन विकास निधीतून सर एम. विश्वेश्वरय्या यांचा पुतळा व संग्रहालय उभारणे, मालेगाव येथे शहीद स्मारक उभारणे, जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना देणे तसेच शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आदी कामांचाही महाजन यांनी आढावा घेतला.
जिल्हा वार्षिक योजनेतून सुरू असलेली विविध विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
त्र्यंबकेश्वर सज्जतेचा आढावा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा महाजन यांनी आढावा घेतला. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हेलिपॅड, कुशावर्त, पुरोहित संघ, गोदावरी कुंड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील व्यवस्थेची माहितीही त्यांनी घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.