एक शून्य शून्य
........
डॉ. अंचल मुदगल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर गुन्हे शाखा युनिट एक, नाशिक
फोटो :H34731
............
बनावट अधिकारी बनून लुटणारी टोळी केली गजाआड
नाशिक शहरातील एका व्यापाऱ्याला महामार्गावर लाल दिव्याच्या कारमधून आलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील ७० लाखांची रोकड ही मनी लॉड्रिंगची असल्याचे सांगत ती काढून घेतली आणि व्यापाऱ्याला रस्त्यात उतरवून पसार झाले. शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या सहा दिवसात बनावट अधिकाऱ्यांची टोळी गजाआड केली.
- नरेश हाळणोर
नाशिकच्या पंचवटी परिसरातील पेठरोड या भागात राहणारे व्यापारी दक्षेशकुमार रमेशभाई प्रजापती हे ८ जुलै २०२६ रोजी त्यांच्या कारने मुंबईच्या दिशेने जात होते. महामार्गावरील सर्व्हिसरोडवरच त्यांची कार असताना अचानक लाल दिव्याची एक पोलिस कार त्यांच्या मागे आली. काही क्षणात त्या कारने प्रजापती यांच्या कारसमोर येत त्यांना रोखले. कारमधून दोघे जण उतरले आणि त्यातील एकाने त्याच्याकडील पिस्तूल काढून प्रजापती यांच्या डोक्याला लावत त्यांना पोलिस कारमध्ये बळजबरीने बसविले. त्यातील दुसऱ्याने आपण मुंबई पोलिस असल्याचे सांगत त्यांच्याकडे असलेली रक्कम ही मनी लॉड्रिंगची असल्याने त्यांना ताब्यात घेत असल्याचे सांगितले. या साऱ्या प्रकारामुळे प्रजापती घाबरले. त्यांच्याकडील बॅगेत ७० लाखांची रोकड होती. ही रक्कम त्यांच्या व्यवसायाशी संबंधित असल्याचे त्यांनी कारमधील पोलिस असलेल्यांना सांगितले. परंतु ते ऐकून न घेता पिस्तूल दाखवून धमकावत होते. मुंबई नाका, पाथर्डी फाटा असे दोन ते तीन वेळा त्यांनी कारमधून फिरविल्यानंतर त्यांना आडगाव हद्दीत कारमधून खाली उतरवून पसार झाले. प्रजापती यांना संशय आल्याने त्यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून आपबिती विशद केली. याप्रकरणी लुटीसह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आयुक्तांकडून गंभीर दखल
नाशिकमध्ये मुंबईचे पोलिस येऊन कारवाई करून गेलेत आणि त्याची कोणतीही पूर्वसूचना शहर पोलिस आयुक्तालयाला देण्यात आली नाही, याची गंभीर दखल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली. प्रथमदर्शनी कारवाई करणारे पोलिस हे तोतया असल्याचीच शक्यता अधिक होती. त्यानुसार त्यांनी शहर गुन्हे शाखेला तातडीने गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी शहर गुन्हे शाखांना सूचना केल्या. शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला. युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी त्यांच्या अनुभवाचा कस लावत, खबऱ्यांना अलर्ट केले. घटनेच्या २४ तासात त्यांना एका खबऱ्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी पथकातील अधिकारी- अंमलदारांना सूचना केल्या. तोपर्यंत तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या पथकाने घटनेच्या दिवसाचे महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले व तपास सुरू केला.
‘तिचा’शोध सुरू
डॉ. मुदगल यांना मिळालेल्या खबरीनुसार, या लुटीच्या प्रकारात एका महिलेचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोध सुरू झाला. प्रजापतीकडे चौकशी केल्यानंतर त्याने कारमध्ये तीन तोतया अधिकारीच असल्याचे त्याने सांगितले होते. तांत्रिक विश्लेषणावरून तोतया अधिकाऱ्यांनी वापरलेल्या इनोव्हा कारचा शोध सुरू होता. अनेक ठिकाणी शोध घेतला पण प्रजापतीने सांगितलेल्या कारचा माग लागत नव्हता. त्यावरून तोतया अधिकाऱ्यांनी कारला बनावट नंबर प्लेट वापरल्याचीच शक्यता बळावली. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर महिलेची प्राथमिक माहिती मिळाली. महामार्गावरून जाणाऱ्या एका इनोव्हा कारमध्ये लुटीच्या दिवशी एक महिला त्या कारमध्ये बसली होती. यावरून युनिट एकच्या पथकाने त्या महिलेची ओळख पटविली. तिचा शोध घेतला असता, ती पाथर्डी फाटा परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. पण ती घरी मिळून आली नाही. तिचा शोध सुरू केला असता, ती डोंबिवलीवरून नाशिकला येणार होती.
पोलिसांचे वेशांतर करून पाळत
डॉ. मुदगल यांच्या पथकातील काही अधिकारी अंमलदारांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर वेशांतर करून सलग दोन दिवस पाळत ठेवली. तर, दोन अंमलदारांनी त्या महिलेच्या पाथर्डी फाटा येथील घरावर पाळत ठेवली. रेल्वे स्थानकावर काही अंमलदार चहावाले झाले. तर काही वडापावच्या गाड्यावर काम करू लागले. एका अंमलदाराने तर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर वेड्याचे रूप घेत नजर ठेवली. रात्रीच्या सुमारास ती महिला आली. वेशांतर केलेल्या अंमलदारांना सतर्क केले गेले. त्यातील काहींनी तिचा पाठलाग सुरू केला. ती पाथर्डीला तिच्या घरी आली. तिला ताब्यात न घेण्याच्या सूचना डॉ. मुदगल यांनी दिल्या होत्या. एक दिवस मुक्काम करून ती पुन्हा रेल्वेने डोबिवलीला गेली. तिच्या मागावर आलेल्या युनिट एकच्या अंमलदारांनी तिथेही वेशांतर करून पाळत ठेवली. तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जात होती. ती एका व्यक्तीसोबत फिरायला बाहेर पडत होती. त्या वेळी तिच्या सोबतच्या व्यक्तीची गोपनीय माहिती काढली असता, तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्यावर महाराष्ट्रात नव्हे; तर परराज्यातही लुट, अपहरणाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्याच्या गुन्ह्यांची मोडस गुन्हे शाखेच्या पथकाने समजून घेतली.
अन् सापळा रचला...
१२ जुलैला संशयित महिला रेल्वेने पुन्हा नाशिकला आली. डॉ. मुदगल यांचे एक पथक तिच्या मागावर होतेच. ती नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून पाथर्डी फाट्यावर आली अन् अवघ्या तासाभरात ती पुन्हा रिक्षाने बिटको चौकात आली. एक पथक तिच्या मागावर तर आणखी दोन पथके मुंबईतून संशयिताच्या कारच्या मागावर होते. या वेळी कारचा नंबर वेगळा होता. या दरम्यान नाकेबंदीच्या ठिकाणी पथकातील काही अंमलदारांनी संशयितांकडे ओळखपत्रांची मागणी केली. त्या वेळी त्याने मुंबई पोलिस दलातील सहायक आयुक्त दर्जाचे ओळखपत्र दाखविले. ते खरे की खोटे याची शहानिशा मात्र करता येत नव्हती. कारमध्ये पुन्हा तिघेजण होते. ही माहिती नाशिकच्या पथकाला देण्यात आली. नाशिकचे पथक संशयित महिलेवर नजर ठेवून होतेच. संशयितांची कार बिटको चौकात आली, पण ते महिलेजवळ न थांबता नाशिकरोड रेल्वेस्थानकाकडून चक्कर मारून परत बिटको चौकात आले. पुन्हा ते बिटको चौकात थांबले पण त्यांनी महिलेला कोणताही इशारा न करता जेलरोडला निघून गेले. त्या वेळीही त्यांच्या मागावरील पोलिसांची कार होतीच. तिसऱ्यांदा ते पुन्हा बिटको चौकात आले आणि ते महिलेपाशी जाऊन थांबले. तिला कारमध्ये घेतले आणि काही अंतर जाताच दबा धरून असलेल्या पोलिसांच्या कारने त्यांना घेरले.
पोलिसांना होती भिती
तक्रारदार प्रजापतीच्या माहितीनुसार संशयितांकडे पिस्तुलीसह अत्याधुनिक स्वरूपाचे रायफल होते. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके धडक कारवाईसाठी योग्य वेळेची संधी शोधत होते. ती संधी १३ जुलैच्या रात्री मिळाली. ही संधी गेली असती तर संशयित पुन्हा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता नव्हती. डॉ. मुदगल यांच्या पथकातील उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, उपनिरीक्षक रमीज शेख, हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, संदीप भांड, समाधान पवार यांच्या पथकांनी चोहोकडून घेरल्याने कारमधील संशयितांना काहीच करता आले नाही. यातील मुख्य संशयित उमाशंकर वर्मा, सुजितकुमार दुबे, नीलेश पका आणि संगीता अहिरे यांना ताब्यात घेतले.
एक नव्हे; अनेक बनावट ओळखपत्र
या गुन्ह्यातील मुख्य संशयित उमाशंकर वर्मा याच्याकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संवेदनशील विभागांचे बनावट ओळखपत्रे जप्त केली आहेत. यात, प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतील वरिष्ठ निरीक्षक पदाचे ओळखपत्र, केंद्रीय रेल्वे विभागातील मुख्य क्रू कंट्रोलर, ''ऑन ड्युटी'' रेल्वे पासेस, केंद्रीय गृह मंत्रालयातील मुख्य अधीक्षकपदाचे ओळखपत्र. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस उपनिरीक्षक पद यासह अनेक प्रकारचे ओळखपत्र पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच, विविध शासकीय विभागांचे रबरी बनावट शिक्केदेखील हस्तगत करण्यात आले. वर्मा हा सराईत गुन्हेगार असून, संगीताशी त्याचे प्रेमसंबंध होते. तो नाशिकमध्ये तिच्याकडेच राहत होता. कारसाठी वापरण्यात येणारे सुमारे २५ पेक्षा अधिक बनावट नंबर प्लेट मिळाल्या. याशिवाय, एका पिस्तुलासह परदेशी बनावटीची अत्याधुनिक अशी एमपी-५ ही रायफलही हस्तगत करण्यात आली होती.
अशी होती मोडस्
संशयित वर्मा हा नाशिक, पुणे, मुंबईसह सुरत, भोपाळ या शहरात नेहमी वास्तव्य करतो. व्यापाऱ्यांमधील होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवतो. नेमकी संधी साधून तो लुटीचा कट रचून तो प्रत्यक्षात आणतो. त्यासाठी तो त्याच्या दोन साथीदारांचीही मदत घेतो. प्रजापतीची लुट केल्यानंतरही हे संशयित नाशिकमधून वेगवेगळ्या दिशेने पसार झाले होते. वर्मा मूळचा उत्तर प्रदेशचा असला तरी तो डोंबिवलीत राहत होता. दोघे वसई, जोगेश्वरीत राहत होते. व्यापाऱ्यांना ईडी, पोलिस, सीबीआय अधिकाऱ्यांची बनावट ओळखपत्र दाखवून त्यांची लूट करीत होते. पण नाशिक पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करीत त्यांना गजाआड केले.
.............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.