पान एक ॲंकर
---------------
33783
नाशिक : संत गाडगे महाराज येथून रामसेतूकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेले बॅरिकेडिंग.
गोदाघाटावर पोलिसांचे कडेकोट बॅरिकेटींग
ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २९ : अवघ्या एका दिवसांवर सिंहस्थाचे ध्वजारोहण सोहळा आला असून, त्याअनुषंगाने गोदाघाटावर कडेकोट बॅरिकेटींग करण्यात आलेले आहेत. ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या अनुषंगाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, पोलिसांकडून सातत्याने गोदाघाटावरील नियोजनाची पाहणी केली जात आहे. दरम्यान, राज्याचे कायदा व सुरक्षा विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण पडवळ हे नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी स्वत: गोदाघाटावरील बॅरिकेटींग व बंदोबस्ताचा आढावा घेतला.
सिंहस्थ ध्वजारोहण येत्या शनिवारी (ता. ३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होत आहे. तसेच, सायंकाळी गोदाआरतीही होणार आहे. यावेळी हजारो भाविक गोदाघाटावर दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार, आमदारही उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, गोदाघाटावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर ध्वजारोहण सोहळ्यासह गोदाआरतीचा सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकही उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी गोदाघाटावर कडेकोट बॅरिकेटींग करण्यात आलेले आहे.
राज्याचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण पडवळ यांनी राष्ट्रपतींच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावर पाहणी केली. यावेळी परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत गवळी, उपायुक्त किशोर काळे यांच्यासह सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
शुक्रवारपासून (ता. ३०) पंचवटी व जुने नाशिक परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त होणार आहे. शहराची मुख्य बाजारपेठही शनिवारी (ता. ३१) बंद राहण्याची शक्यता आहे.
-----------
पाच हजार पोलिसांचा फौजफाटा
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यासाठी शहर, ग्रामीण पोलिसांशिवाय राज्यभरातून सुमारे पाच हजार पोलिसांचा फौजफाटा नाशिकमध्ये उद्या (ता. २९) दाखल होणार आहे. याशिवाय शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतुक शाखेचे १९० अधिकारी अंमलदारांसह सुमारे ५६९ वाहतूक अंमलदार वाहतूक नियमनासाठी रस्त्यावर असतील. तर, त्र्यंबकेश्वर परिसरातही २०० वाहतूक शाखेचे अधिकारी, अंमलदार तैनात असणार आहेत.