नाशिक

दिवाळी विशेष पुरवणी लेख

CD
दिवाळी विशेष पुरवणी लेख (रिअल इस्टेट) -------------------------- वाड्यांच्या शहरापासून गेटेड कम्युनिटीच्या नाशिकपर्यंतचा प्रवास ------------------------- नाशिक म्हणजे केवळ कुंभमेळा, गोदाकाठ आणि त्र्यंबकेश्वर नव्हे. आता ते महाराष्ट्राच्या नकाशावरचे वेगाने वाढणारे टियर २ शहर बनले आहे. वाडा संस्कृतीतून सुरू झालेला हा प्रवास आजच्या घडीला गेटेड कम्युनिटी, टॉवर आणि सेकंड होमपर्यंत येऊन पोहोचला आहे. चांदा ते बांदा, हा संपूर्ण पट्टा या बदलाचा जिवंत साक्षीदार आहे. - विक्रांत मते. एकेकाळी नाशिकची ओळख ही केवळ धार्मिक, शेतीप्रधान शहर अशी होती. शहर पंचवटी, जुने नाशिक, रविवार कारंजा, कॅनडा कॉर्नर एवढ्यापुरताच विकास मर्यादित होता आणि वाडे, बंगले आणि चाळी हेच घरांचे रूप होते. जमिनीचे भाव कमी होते. पण घर घेणारा माणूसही मोजकाच होता. द्राक्ष शेती आणि धार्मिक पर्यटन हाच तेव्हाचा अर्थकारणाचा कणा होता. कालांतराने औद्योगीकरण वाढल्याने नाशिकने चित्र बदलले. १९९० नंतर नाशिकने कूस बदलली. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीसाठी सुमारे १२०० हेक्टर जमीन संपादित झाली. ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी उद्योग आले. मुंबई-पुण्याच्या जवळीकतेचा फायदा झाला. अभियंते, कामगार, नोकरदार वर्ग नाशिकमध्ये स्थिरावू लागला आणि घरांची मागणी वाढली. इंदिरानगर, गंगापूर रोड, कॉलेज रोड, पाथर्डी फाटा हे नवे निवासी पट्टे तयार झाले. बंगल्यांबरोबरच रो-हाऊस, छोटी अपार्टमेंट्‌स आणि सहकारी गृहनिर्माण संस्था दिसू लागल्या. २००५ नंतर संघटित बांधकामाची लाट आली. २००५ ते २०१४ हा काळ व्यावसायिक विकासकांचा ठरला. गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, मुंबई-आग्रा महामार्ग परिसर, जेल रोड येथे उंचच उंच इमारती उभ्या राहिल्या. गेटेड कम्युनिटी ही संकल्पना शहरात रुजली. मुंबई नाका आणि कॉलेज रोडवर मॉल्स, शोरूम्स आली. नाशिक आता केवळ राहण्याचे शहर राहिले नाही, तर गुंतवणुकीच्या मानाने महत्त्वाचे शहर बनले. ------------------ मंदीने शिकवला शिस्तीचा धडा २०१४ ते २०२० या काळात नोटबंदी, जीएसटी आणि रेरा या तीन मोठ्या बदलांनी बाजाराला हादरा दिला. अनेक छोटे बांधकाम व्यावसायिक बाहेर पडले. पण हाच काळ क्षेत्राला अधिक पारदर्शक आणि संघटित करणारा ठरला. नवे एफएसआय धोरण आणि पुनर्विकासाला चालना मिळाली. कोरोनानंतर नाशिककडे स्थलांतराची लाट आली. २०२० नंतरचे चित्र पूर्णपणे बदलले. मुंबई-पुण्यातील महागाई, गर्दी आणि प्रदूषणाला कंटाळलेले लोक नाशिककडे वळले. चांगले हवामान, कमी किंमत आणि मोकळी हवा ही नाशिकची जमेची बाजू ठरली. समृद्धी महामार्ग, ओझर विमानतळाचा विस्तार, स्मार्ट सिटी प्रकल्प, रस्त्यांचे जाळे आणि वाईन पर्यटनामुळे सेकंड होमची संकल्पना वाढली. २०१४-१५ मध्ये नाशिकमध्ये सुमारे ३.८ लाख मालमत्ता होत्या. २०२४-२५ मध्ये त्या सहा लाखांवर पोहोचल्या. केवळ २०२४-२५ मध्ये ४८ हजार ४०० मालमत्ता व्यवहार झाले, त्यांचे एकूण मूल्य १४ हजार ४८१ कोटी रुपये इतके आहे. सध्या २ ते ४ बीएचके घरांना सर्वाधिक मागणी आहे. यांचे दर साधारण ३ ते १५ हजार रुपये प्रतिचौरस फूट आहेत. मुंबई, पुणे, जळगाव, धुळे येथील गुंतवणूकदार नाशिकमध्ये येत आहेत. आजच्या स्थितीत गंगापूर रोड, आडगाव, मखमलाबाद, पाथर्डी, इंदिरानगर, त्र्यंबक रोड, जेल रोड हे वेगाने वाढणारे पट्टे आहेत. सिन्नर औद्योगिक कॉरिडॉर आणि ओझर विमानतळापर्यंत शहर पसरले आहे. मध्यवर्ती भागातील दर वाढल्याने लोक बाह्य भागाकडे वळत आहेत. पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा, परिक्रमा मार्ग म्हणजेच बाह्य रिंगरोड, वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग यामुळे २०२५ ते २०३५ हे दशक नाशिकसाठी निर्णायक ठरणार आहे. पंचवटी आणि जुन्या नाशिकमध्ये पुनर्विकासाला वेग आला आहे. थोडक्यात, वाड्याच्या अंगणातून सुरू झालेला नाशिकचा प्रवास आज आधुनिक, नियोजित आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या शहरापर्यंत पोहोचला आहे. -------------------- भविष्यातील नाशिक नाशिक शहराबरोबरच उपनगरांचा वेगाने विकास होत आहे. मखमलाबाद, जेलरोड, इंदिरा नगर, पाथर्डी, आनंदवली हि नवीन नगरे उदयाला येत आहे. या भागात गेटेड कम्युनिटी प्रकल्प वाढत आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबईत दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाथर्डी भागात गृह प्रकल्प वाढले आहेत. अंबड या कामगार वसाहतीमध्ये कमी किमतीचे फ्लॅटस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. गोदावरी नदीवर गंगापूर रस्त्याला समांतर दोन पुलांमुळे मखमलाबादचा विकास झपाट्याने होत आहे. ६५ कोटी रुपये खर्च करून गंगापूर रस्त्याला समांतर रस्ता तयार होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटणार असल्याने पाइपलाइन रस्त्यावरील प्रकल्पांना गती मिळाली आहे. ---------------------- प्राधिकरणाला अच्छे दिन शहराच्या धकाधकीच्या जीवनातून दुर राहणे अनेक जण पसंत करत असल्याने इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्‍वर भागात फार्म हाऊस घेऊन वास्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सुयोजित नगरे तयार व्हावी यासाठी नाशिक महानगर विकास प्राधिकरणाने नियमावली तयार केली असून अरुंद रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात अवघ्या दहा ते तीस मिनिटात पोहोचून पुन्हा वास्तव्याला शांत ठिकाणी जाण्याकडे कल वाढत आहे. -----------------------------

गाड्यांचे इंजिन धोक्यात! पेट्रोलमध्ये मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉलची भेसळ; कर्नाटक सरकारचे तेल कंपन्यांवर गंभीर आरोप

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

SCROLL FOR NEXT