डिसेंबरअखेर दहा एटीएममधून लाभार्थींना धान्य
---
जिल्हा पुरवठा विभाग : एक हजार लाभार्थींनी घेतला लाभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : जिल्हा पुरवठा विभागाच्या धान्य एटीएमला शिधापत्रिकाधारक लाभार्थींचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. एक हजारांहून अधिक लाभार्थींनी या मशिनमधून धान्य उचल केली. विशेषत: दिवाळी कालावधीत लाभार्थींसाठी हे एटीएम आधार ठरले. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत अतिरिक्त दहा एटीएम सुरू करण्याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाने केली आहे.
स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत नाशिक रोड येथील जुन्या धान्य वितरण अधिकारी कार्यालयात धान्य एटीएम कार्यन्वित करण्यात आले. राज्यातील या पायलट प्रकल्पाला लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, गेल्या महिनाभरात हजारांहून अधिक लाभार्थींनी या एटीएममधून धान्य उचल केली. प्रायोगिक स्तरावर हा प्रकल्प यशस्वी ठरल्याने जिल्हा पुरवठा विभागाने आता नाशिक शहर व त्यानंतर ग्रामीण भागात त्याचा विस्तार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्हा पुरवठा विभागातर्फे नाशिक शहरात विविध दहा ठिकाणी तसेच येवल्यात एका ठिकाणी मशिन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव पुरवठा विभागाने राज्यस्तरावर सादर केला. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल. त्यानुसार डिसेंबरअखेरपर्यंत शहरातील दहा ठिकाणी एटीएम मशिन कार्यान्वित होतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.
लाभार्थींची परवड थांबणार
शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य पुरवठा करण्यात येतो. महिन्याकाठी स्वस्त धान्य दुकानांमधून हे धान्य वितरण केले जाते; परंतु स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा, काही ठिकाणी दुकानदारांची मनमानी, तसेच ठराविक मर्यादेपेक्षा कमी प्रमाणात उपलब्ध होणारे धान्य अशा विविध समस्यांना लाभार्थींना सामोरे जावे लागते. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारतर्फे व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला जात आहे. या बदलांचा भाग म्हणून एटीएमचा पर्याय पुढे आला. या व्यवस्थेमुळे भविष्यात लाभार्थींची परवड कायमस्वरूपी थांबणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.