फोटो : H32004
नाशिक : जप्त केलेला प्रतिबंधित गुटखा, वाहन आणि अटकेतील संशयित. समवेत अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक.
शिंदेतून साडेअकरा
लाखांचा गुटखा जप्त
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : प्रतिबंधित गुटख्याची शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने शिंदे गाव परिसरात छापा टाकून तब्बल ११ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे आठ लाखांचे पिकअप असा एकूण १९ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने, सहाये आयुक्त एस. एस. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय गुप्तचर विभागाकडून (आयबी) गोपनीय माहिती मिळाली असता, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रविवारी (ता. ११) शिंदेगावात छापा टाकला. या कारवाईदरम्यान राज इलियास सय्यद याच्याविरुद्ध गुटखा विक्रीप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली. पथकाने घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा जप्त केला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक आयुक्त (अन्न) एस. एस. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी प्रतीक भड, सुहास मंडलिक, श्रद्धा राहिंज, वैभव गर्दे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.